

जळगाव : जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गावातून शेतातील ठिबकच्या ३५ बंडल चोरीस गेले. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) यावल येथील भंगार दुकानदारासह चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी ४ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फत्तेपुर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फत्तेपुर शिवारातील गट क्रमांक ३९ मधील शेतातून ठिबक नळयांचे ३५ बंडल चोरीस गेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करत जामनेर शहरातील बोदवड रोडवरील शेख अस्लम शेख मेहबुब यांच्या भंगार दुकानात छापा टाकला असता, तेथे चोरीस गेलेले ठिबक नळयांचे बंडल आढळून आले.
शेतकऱ्याच्या ओळखीवरून भंगार दुकानदारास विचारले असता, त्याने सदर नळया शेख जावेद शेख सुल्तान (वय ३६), इकबाल उस्मान पिंजारी (वय ३०), आणि आलमगीर रफीक पिंजारी (वय ३५, सर्व रा. जामनेर) यांच्याकडून घेतल्याचे कबूल केले. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
त्यांच्याकडून एकूण १.०५ लाख रुपये किंमतीच्या ३५ बंडल ठिबक नळया तसेच ३ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी जप्त करण्यात आली. आरोपींना पुढील तपासासाठी फत्तेपुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अंकुश जाधव, पोउपनि शेखर डोमाळे, पोना रणजित जाधव, पोकों ईश्वर पाटील, राहुल महाजन (सर्व स्था.गु.शा. जळगाव) यांच्या पथकाने केली. पुढील तपास फत्तेपुर पोलीस ठाणे करत आहे.