

जळगाव : शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील श्री प्लाझा येथे शनिवार (३ मे) रोजी रात्री अनैतिक संबंधाच्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच संशयितांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश पंडित भावसार (वय २७, रा. अशोक नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुलांचा परिवार आहे.
शनिवार (३ मे) रोजी रात्री सुमारे पावणे अकरा वाजता आकाशच्या घरी पत्नी पूजा भावसार हिचा मावस भाऊ अजय मंगेश मोरे, चेतन रवींद्र सोनार आणि आणखी तीन अनोळखी इसम दोन स्कुटीवरून आले. त्यांनी आकाशची चौकशी केली असता, पूजाने आकाशला फोन करून त्याचा ठावठिकाणा विचारला. आकाशने “श्री प्लाझा, ए वन भरीत सेंटर जवळ आहे” असे सांगितल्यानंतर सर्व आरोपी त्या दिशेने रवाना झाले.
त्यानंतर काही वेळातच संशयितांनी श्री प्लाझा परिसरात आकाशला गाठून धारदार शस्त्राने गंभीर जखमी केले. त्यावेळी आकाशसोबत असलेले शैलेश पाटील व वैभव मिस्तरी हे घाबरून पळून गेले. आकाशने जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी पाठलाग करून त्याला पुन्हा एकदा हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. कुणाल सोनार यांच्या मदतीने जखमी आकाशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेनंतर आकाशची आई कोकिळाबाई पंडित भावसार (वय ५४) यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अजय मोरे आणि इतर चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय मोरे याचे आकाशच्या पत्नी पूजासोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून त्यांच्यात पूर्वीही वाद झाले होते. सूडबुद्धीनेच अजयने साथीदारांच्या मदतीने आकाशचा खून केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजिद मंसूरी करीत आहेत.