

जळगाव: गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामनेर येथील २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील जंगलातील तलावात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जुन्या किरकोळ वादातून त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, एमआयडीसी पोलिसांनी गुजरात येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार (वय २७) हा तरुण सोमवार ( दि.15) रोजी रात्री ८ वाजेपासून बेपत्ता झाला होता. त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. दरम्यान, रामदेववाडी परिसरात निलेशची दुचाकी आढळून आली होती. यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची नोंद केली होती.
मृतदेह पोत्यात भरून तलावात फेकला
तपासादरम्यान गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना संशयास्पद माहिती मिळून आली. त्यानुसार पोलिस पथकाने गुजरातमध्ये जाऊन भूषण बाळू पाटील आणि दिनेश चौधरी (महाजन) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी जुन्या वादातून निलेशची हत्या केल्याची कबुली दिली. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून रामदेववाडी येथील जंगलातील तलावात टाकून दिल्याचे त्यांनी सांगितले.
संशयितांच्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.19) रोजी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी शिरसोली ते रामदेववाडी दरम्यानच्या जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. सकाळी सुमारे १० वाजता रामदेववाडी येथील घनदाट जंगलातील तलावात निलेशचा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे जामनेर आणि जळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.