

जळगाव : तलवार व कोयता हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. बोदवड येथे ही कारवाई करण्यात आली.
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात मिश्र वस्ती असलेल्या भागात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिले होते. त्या अनुषंगाने एलसीबीच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
श्रीकृष्ण देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार सोमवार (दि.9) रोजी एक इसम हातात तलवार व कोयता घेऊन बोदवड ते शेलवड व महालक्ष्मी माता मंदिर, तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दहशत माजवत आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, प्रितम पाटील, रविंद्र चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत पुरुषोत्तम श्रावण वंजारी (वय 26, रा. माळीवाडा, बोदवड) हा तलवार व कोयता हातात घेऊन फिरताना आढळून आला. त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे 4,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.