

जळगाव: जळगाव-भुसावळ रोडवरील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात चोरट्यांनी तब्बल 11 लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही रोकड महाविद्यालयातील मुलींच्या मेस शुल्काची रक्कम असल्याचे वृत्त आहे.
दिवाळी सुट्ट्यांमुळे काही कार्यालये बंद असल्याचा फायदा घेत, चोरट्यांनी मध्यरात्री गुरुवार (दि.30) महाविद्यालयात प्रवेश केला. त्यांनी आस्थापना विभागातील चार कॅबिन्सची कपाटे फोडून रोकड चोरली. पहाटे चारच्या सुमारास ही घटना समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा तसेच सीसीटीव्ही तपास सुरू केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेमध्ये घडलेल्या या मोठ्या चोरीमुळे एमआयडीसी परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चोरीच्या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, फुटेजमध्ये चार चोरटे स्पष्ट दिसत आहेत. पोलिसांनी फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे.