

मलकापूर (जळगाव ) : मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने मलकापूर येथील प्रवासी आरक्षण केंद्रावर (Passenger Reservation Center) मोठी कारवाई केली. या दरम्यान दोन दलालांना अटक करण्यात आली असून, १० लाख रुपयांहून अधिक किमतीची १८२ रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.
विशेष माहितीच्या आधारे दक्षता पथकाने गुरुवार (दि.22) रोजी मलकापूर येथील पीआरएस कार्यालयात छापा टाकला. यावेळी ३,९६० रुपयांचे वातानुकूलित तत्काळ तिकीट असलेल्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची ओळख संजय चांडक (स्थानिक सूत्रधार) आणि १७ वर्षीय सहाय्यक प्रसाद काळे अशी झाली.
चौकशीत संजय चांडकने मुंबईतील कुख्यात दलाल 'ठाकूर'शी संबंध असल्याचे उघड केले. त्याने व्हॉट्सॲपवरून पीआरएस मलकापूरमार्फत बुक केलेल्या १८२ जेसीआर (Journey cum Reservation) तिकिटांचे फोटो ठाकूरला पाठवल्याचे समोर आले. यामध्ये २३ लाइव्ह तिकिटांची किंमत १,६१,५३५ रुपये आणि १५९ जुन्या तिकिटांची किंमत ८,४८,२९८ रुपये असून एकूण तिकीट किंमत १०,०९,८३३ रुपये इतकी होती. ही सर्व तिकिटे बेकायदेशीर पुनर्विक्रीसाठी बुक करण्यात आली होती.
दक्षता पथकाने दोघांना अटक करून रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) मलकापूर विभागाकडे सोपवले. त्यांच्या विरोधात रेल्वे कायदा कलम १४३ अंतर्गत CR क्रमांक २७८/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये वापरलेली २३ लाइव्ह तिकिटे तत्काळ ब्लॉक करण्यात आली आहेत. पुढील तपास आरपीएफ मलकापूरकडून सुरू आहे. मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाने स्पष्ट केले आहे की, बेकायदेशीर तिकीट व्यवहार रोखण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांना न्याय्य व पारदर्शक सेवा मिळवून देण्यासाठी त्यांची कारवाई सुरूच राहणार आहे.