

रावेर (जळगाव) : रावेर शहरातील रसलपूर रस्त्यावरील एसटू हॉटेलच्या मागील बाजूस बाबुळच्या झाडाखाली सुरू असलेल्या अवैध पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'झन्ना मन्ना' नावाचा पत्त्याचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. या कारवाईदरम्यान ११ हजार रुपयांची रोख रक्कम, अंदाजे ७५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली आणि पत्त्यांचा कॅट जप्त करण्यात आला. या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जुगार खेळत असल्याचे समोर आले.
या प्रकरणी गणेश भदाणे, अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय यांनी रावेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार विनायक सुनिल महाजन, सुरज महाजन, रितेक महाजन, लव महाजन, शुभम महाजन आणि मनिष महाजन यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, सहायक पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि रावेर पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. योगेश पाटील हे पुढील तपास करत आहेत.
शहरातील मध्यवर्ती भागात बिनधास्त सुरू असलेल्या अवैध क्लबवर पोलिसांनी केलेली ही कारवाई आता जुगार अड्डांसाठी इशारा देणारी ठरत आहे. यामुळे पोलिसांकडून अशा जुगार अड्ड्यांवर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.