

जळगाव : जिल्ह्यात चोरी आणि घरफोड्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरी, घरफोडी अशा घटनांची नोंद होत आहे. भुसावळ, अंमळनेर, चोपडा आणि जळगाव शहरात नुकत्याच झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये एकूण 1 लाख 40 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यांमध्ये संशयित चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भुसावळ - भुसावळ शहरातील प्लॉट नंबर 9, सोपान कॉलनी, शांतीनगर येथे 24 व 25 मार्च रोजी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून टीव्ही, इतर साहित्य आणि 15,000 रुपये रोख असा एकूण 28,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद तपास करत आहेत.
अंमळनेर - अंमळनेर बस स्थानकावर कल्पना पाटील आणि त्यांच्या सुनबाई पारोळा बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने 15 ग्रॅम वजनाची 45,000 रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली. या प्रकरणी अंमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, हेड कॉन्स्टेबल संतोष पवार पुढील तपास करत आहेत.
चोपडा - चोपडा शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गजानन केशव पाटील (वय 75) आले असता, त्यांची कापडी पिशवीतील 75,000 रुपये अज्ञात व्यक्तीने लंपास केले. या प्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे तपास करत आहेत.
जळगाव - जळगाव शहरातील सुनिता साहेबराव सोनवणे या पंजाब नॅशनल बँक, नवी पेठ येथून जात असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील 12,200 रुपये लंपास केले. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हेड कॉन्स्टेबल किशोर निकुंभ पुढील तपास करत आहेत.
जिल्ह्यात सतत वाढत असलेल्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यांची तातडीने उकल करून आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.