

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर मुक्ताईनगर पोलिसांनी गुन्हेगारांचा थरारक पाठलाग करून तब्बल १ कोटी २ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलिसांनी ही कारवाई पार पाडली.
गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांनी मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधला. पूर्णाड फाटा येथे नाकाबंदी दरम्यान संशयित आयशर ट्रक (क्र. MH 40 CD 9358) दिसला. पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला तरी वाहनचालकाने ट्रक न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी साडेअकरा वाजता सारोळा फाट्यावर संशयित ट्रक ताब्यात घेतला आहे.
ट्रकची झडती घेतल्यावर ७७ लाखांचा गुटखा, २५ लाखांचा ट्रक व १२ हजारांचा मोबाईल असा एकूण १ कोटी २ लाख ३३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक चालक आशिष राजकुमार जयस्वाल (रा. देवास, मध्यप्रदेश) याला अटक केली असून, ट्रक मालक आशिक खान बुल्ला खान (रा. नागपूर) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने जुलै २०२५ पासून गुटखा निर्मिती, साठा आणि वाहतूक यावर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपींवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, उपनिरीक्षक जयेश पाटील, सोपान गोरे, तसेच सलीम तडवी, छगन तायडे, रतन गीते, मयूर निकम, भरत पाटील, देश पाटील, भाऊराव घेते, अशी तडवी, राकेश धनगर आणि संदीप धनगर यांनी ही कारवाई यशस्वी केली.