

जळगाव : अमळनेर तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी दिनेश साळुंखे यांना 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. साळुंखे यांच्यावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तामसवाडी ग्रामपंचायत क्षेत्रात रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे ५ लाखांचे काम पूर्ण केले होते. यापैकी ४ लाख रुपयांचे बिल त्यांना मिळाले होते. उर्वरित कामासंदर्भात चौकशी करण्यासाठी ते आणि त्यांचे चुलत काका ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता, अधिकारी दिनेश साळुंखे यांनी १० टक्के टक्केवारी म्हणजेच ४० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने तत्काळ धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तक्रारीची पडताळणी १९ मे रोजी करण्यात आली असता साळुंखे यांनी पुन्हा लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचून साळुंखे यांना अमळनेर येथील दगडी दरवाजासमोर, राजे संभाजी चौकात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. साळुंखे यांनी दुचाकीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र एसीबी पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली. साळुंखे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.