

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव शिवारात उघडकीस आलेल्या अवैध गांजा लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्त छापा टाकून तब्बल २३ लाख २२ हजार २०० रुपये किमतीची झाडे जप्त केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
मानेगाव येथील मनोज नामदेव घटे (४०) यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. एलसीबी आणि मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी १९ तारखेला संबंधित शेतावर छापा टाकला.
यावेळी ३ क्विंटल ४१ किलो ५०० ग्रॅम वजनाची एकूण ५१ गांजाची झाडे जप्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात या मालाची किंमत अंदाजे २३ लाखांहून अधिक आहे. लागवड करणारा मनोज घटे याला अटक करून त्याच्याविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.
अंमली पदार्थांविरोधात जिल्ह्यातील कारवाई प्रभावी ठरावी यासाठी ही धडक मोहीम हाती घेण्यात आली. या ऑपरेशनमध्ये भुसावळ आणि मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकांनी सहभाग घेतला. विविध स्तरांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून ही कारवाई पूर्ण केली.