

जळगाव ( पिंपळगाव हरेश्वर ) : शेवाळे गावात वृद्ध महिलेचा निर्घृण खून करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपींचा छडा लावत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अवघ्या ४८ तासांत तीन आरोपींना अटक केली आहे.
गुरुवार (दि.5 ) रोजी रात्री ९ ते ११ वाजेच्या सुमारास संशयित आरोपीने शेवाळे गावातील राहत्या घरी घुसून जनाबाई महारु पाटील (वय ८५) यांच्या डोक्यात हत्याराने वार करत खून केला. त्यानंतर त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबाडले. या घटनेनंतर जनाबाई यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार (दि.6) रोजी यंशयित आरोपीविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी संयुक्त तपास सुरू केला. तपासादरम्यान शेवाळे गावातील तीन तरुणांवर संशय आल्याने साहील मुकददर तडवी (वय २१), राकेश बळीराम हातागडे (वय २१) आणि राजेश अनिल हातागडे (वय १८) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून मृत जनाबाई पाटील यांच्या घराच्या ओट्यावर बसून टिंगलटवाळी केल्याने त्यांनी आरोपींना पूर्वी खडसावले होते. त्याचा राग मनात धरून तरुणांनी खुनाचा कट रचला. घराच्या मागच्या दरवाजाने प्रवेश करून त्यांनी हत्या केली व दागिने चोरून अंधारात पसार झाले.
पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पिंपळगाव हरेश्वरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. तर शेखर डोमाळे, शरद बागल, विठ्ठल पवार, प्रकाश पाटील, अतुल वंजारी, लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, किशोर पाटील, भरत पाटील, महेश सोमवंशी, नरेंद्र नरवाडे, अभिजित निकम, अमोल पाटील, इमरान पठाण, मुकेश लोकरे, नामदेव इंगळे, मुकेश तडवी, सागर पाटील यांनीही या तपासात सहकार्य केले. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे पुढील तपास करत आहेत.