

जळगाव (चोपडा) : चोपडा शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेत एक धक्कादायक घटना घडली असून, बँकेतून पैसे काढल्यानंतर वृद्धाच्या पिशवीतून तब्बल ५० हजार रुपये चोरी गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन संशयित महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर पंढरीनाथ पाटील (वय ६४, रा. त्र्यंबक नगर, चोपडा) हे एम.जी. कॉलेजजवळील बँक ऑफ इंडिया शाखेत गेले होते. त्यांनी तेथून ८० हजार रुपये रोख रक्कम काढून ती एका प्लास्टिक पिशवीत ठेवली. बँकेतील चलन काउंटरवर आर.डी. (Recurring Deposit) भरताना, त्यांच्या मागे उभ्या असलेल्या ३० ते ३५ वयोगटातील तीन महिलांनी संगनमताने पिशवी अर्धवट कापून त्यातील ५० हजार रुपये चोरले. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून सशंयित आरोपी महिलांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात महिलांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हर्षल पाटील करत आहेत.