

जळगाव : अमळनेर शहरातील बाजारपेठेत आंबे खरेदी करत असताना शेतकऱ्याच्या दुचाकीच्या हँडलला ठेवलेली तीन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१० जून) दुपारी दीड वाजता घडली. याप्रकरणी रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी भानुदास पाटील (वय ५९, रा. वासरे, ता. अमळनेर) हे शेती करून उदरनिर्वाह करणारे शेतकरी आहेत. मंगळवारी ते दुचाकीवरून अमळनेर शहरात आले होते. शहरातील विजय शॉपीसमोरील हातगाडीवर आंबे खरेदी करत असताना त्यांनी दुचाकीच्या हँडलला तीन लाख रुपये रोख असलेली पिशवी टांगलेली होती. या दरम्यान, अज्ञात चोरट्याने ही पिशवी लांबवून नेली.
घटनेनंतर त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र कुठलीही माहिती मिळाली नाही. अखेर रात्री ११ वाजता त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.