देविदास लांजेवार
काश्मिरातील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 52 सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याची जबाबदारी जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्यानंतर भारतीय जनक्षोभाचा रोख या संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझर याच्या दिशेने वळला. भारतानेही त्याचा पाठीराखा पाकिस्तानवर कारवाई करण्याचा रेटा अमेरिकेकडे सारखा लावलेला आहे. आतापर्यंत तरी पुलवामा हल्ल्यामागे जैश या एकच दहशतवादी संघटनेचे डोके काम करीत होते, असा सर्वांचाच समज होता. मात्र मागील आठवड्यात बिहारच्या दहशतवादविरोधी पथकाने पुणे एटीएसच्या मदतीने चाकण येथून इसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया) च्या संपर्कात असलेल्या एका युवकास अटक केल्याने पुलवामा हल्ल्याचा कट रचण्यात आणखी काही दहशवादी संघटनांचे डोके काम करीत होते की काय, हा संशय बळावला आहे.
सीआरपीएफ जवानांच्या पोस्टिंगची कागदपत्रे बाळगणार्या खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोन बांगलादेशींना बिहार एटीएसने पाटणा येथून अटक केली होती.त्यांच्याकडे जम्मू-काश्मिरातील सुरक्षे संबंधित संवेदनशील माहिती असलेली कागदपत्रे सापडली होती. सिरियामध्ये जाऊन इसिसमध्ये भरती होण्याचा या दोघांचा बेत होता. त्याआधी त्यांना भारतातील काही प्रमुख शहरांची रेकी करून दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी तरुणांना गळास लावण्याचे काम तडीस न्यावयाचे होते. या दोघांच्या गळाला शरियत हा युवक लागल्याचे चौकशीतून पुढे आले. या माहितीच्या आधारे बिहार एटीएसच्या पथकाने पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील बाजीपूरचा मूळ रहिवासी असलेल्या शरियत अन्वर उल हक मंडल या 19 वर्षीय युवकास चाकणच्या खालुंब्रे येथून उचलले. शरियत याने आपण खैरूल आणि अबू सुलतान यांच्या संपर्कात असल्याचे मान्य केले. ते तिघेही इस्लामिक स्टेट ऑफ बांगलादेश (आयएसबीडी) आणि जमात उल मुजाहिद्दीन (जेएमबी) या दहशतवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचे सिद्ध झाले आहे.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या दूरध्वनी संभाषणाचा एक ऑडिओ पंधरा वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता. " मैं औरत जात से पैसा नही मांगता," असे वक्तव्य त्याने केल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकावयास मिळाले. या वाक्यातून खंडणी वसुलीचे काही नियम दाऊदने स्वत:वर घातले असून तो ऊठसूट कुणालाही खंडणी मागत नाही, असे त्यातून स्पष्ट होते. कुख्यात डॉन असो की दहशतवादी संघटना; त्यांचे त्यांच्यासाठी का होईना परंतु लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी स्वत:साठी काही नियम घातले आहेत. मात्र इसिस ही अत्यंत क्रूर अशी दहशतवादी संघटना आहे की जिचा नैतिकतेशी सुतराम संबंध नाही. या संघटनेने नैतिक अशी कोणतीही बंधने स्वत:वर घातलेली नाहीत. लहान मुलांची ऊठसूठ हत्या करणे अथवा महिला, तरुणींवर अत्याचार करून, त्यांचे हाल हाल करून ठार मारणे याचे त्यांना काहीच वाटत नाही. उलट्या काळजाची अथवा काळीज नसलेली माणसे या संघटनेत काम करतात असेच म्हणावे लागेल. अबू बकर अल बगदादी या अशाच उलट्या काळजाच्या माणसाने इराक युद्धानंतर 2003 मध्ये इसिस अर्थात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. मॅनेजमेंट आणि अॅडमिनिस्ट्रेशनच्या अंगाने विचार केला तर बगदादीचा, प्रत्येक आघाडीचा एक कमांडर नियुक्त करून त्याकरवी दहशतवादी कारवाया तीव्र करण्याचा विचार फारच कल्पक आहे. इराक, सिरिया या दोन देशांमध्ये बगदादी याची विध्वंसक कल्पकता फलद्रूप झाली, त्याने या दोन देशांत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. परिणामी त्याचे धाडस वाढले. संपूर्ण जगाने इसिसच्या क्रौर्याचा धसका घेतला. त्यानंतर बगदादीने लिबिया, अल्जेरिया, येमेन, पश्चिम आफ्रिका आणि सोमालियासह अनेक देशांमध्ये इसिसच्या आघाड्या स्थापन केल्या.
पहिली घुसखोरी पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात मुस्लिमबहुल देश अथवा प्रांतात घुसखोरी करून तेथील मुस्लिम युवकांना गळाला लावणे हा इसिसचा मुख्य अजेंडा आहे. त्यानुसार 2014 साली भारतात सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये इसिसच्या कथित आदर्शवादाचा पाश मोहम्मद मोसिउद्दीन ऊर्फ अबू मुसा या 26 वर्षीय किराणा दुकानदाराभोवती आवळला. पश्चिम बंगालमधील इंडियन मुजाहिद्दीनचा माजी कमांडर शफी अर्मार ऊर्फ युसूफ अल हिंदी या स्वयंघोषित 'अमिर ऑफ जुनूद अल खलिफा ए हिंद' याच्या संपर्कात अबू मुसा आला होता. पाश्चिमात्त्य देशांत घातपाती कारवाया करण्याची जबाबदारी मुसावर सोपविण्यात आली होती. मात्र 2016 मध्ये तो पकडला गेला. त्यानंतर 2014 मध्ये महाराष्ट्रातील कल्याणमधील चार युवकांनी घर सोडून सिरियाची वाट धरली. या चौघांमध्ये अरिब माजिद या एका युनानी डॉक्टरच्या मुलाचाही समावेश होता. 2014 ते 2017 या कालावधीत या चौघांपैकी फाहाद तन्वीर शेख, अमन नईम तांडेल आणि शाहीम तंकी हे तीन तरुण मारले गेले. मात्र माजिद शरण आला आणि तुर्कीवरून त्याच्या पालकांना मुलाला मायदेशी परत आणण्यात यश आले.
औद्योगिक हब चाकण सध्या टार्गेट
पुणे जिल्ह्यातील चाकण हे सध्या वाहन उद्योगांचे हब म्हणून ओळखले जाते. या भागात उत्तर भारतीय प्रामुख्याने बिहार आणि उत्तर प्रदेशातील मुस्लिम युवक मोठ्या संख्येने रोजगारासाठी वास्तव्यास आहेत. चाकणपासून दीडशे किमी अंतरावर मुंबई, तेवढ्याच अंतरावर नाशिक आणि अगदी जवळ अहमदनगरचा समृद्ध, संपन्न परिसर आहे.
पुणे, मुंबई, नाशिक आणि अहमदनगर या महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या भूभागात चाकणला केंद्रबिंदू मानून कटकर्त्यांचा अड्डा तर बनवायचे नाही ना, अशी शंका नाकारता येत नाही. कारण मागील वर्षी मराठा क्रांती मोर्चावेळी चाकणमध्ये घडवलेल्या दंगलीत स्थानिकांचा नव्हे तर परप्रांतीयाचा हात होता, असे स्पष्ट झाले होते.
त्यामुळे उद्योगातील कामगारांच्या चेहर्याआड इसिसचे मोड्युल तर कार्यरत नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. यावरून पुलवामाच्या सूत्रधारांचे हातपाय नेमके कुठपर्यंत पसलेले आहेत, याचा छडा लावण्यासाठी भारतीय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना आणखी बरेच श्रम घ्यावे लागणार असे दिसते.