

सिन्नर (नाशिक) : येथील एका सराफ व्यावसायिकाला फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विशास संपादन करून तब्बल 64 लाख 80 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी नाशिक ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार जयेश माणिकलाल नाईक (50, ज्वेलर्स, रा. शिवाजीनगर, सिन्नर) याने दिलेल्या माहितीनुसार, रिचा पटेल व ट्रस्टक्वाइन ट्रेडिंग या व्हॉट्सअॅप गु्रपचे अॅडमिन चार्ली नामक व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधण्यात आला. त्यानंतर मो. नं. 9208705108 वापरणारा संशयित आरोपी चार्लीने नाईक यांना ‘ट्रस्टक्वाइन ट्रेडिंग’ या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतले. त्यांनी नाईक यांचा विेशास संपादन करून वेळोवेळी ‘ट्रस्टक्वाइन ट्रेडिंग’ या वेबसाईटवर पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले.
तक्रारदार नाईक यांनी त्यांच्या स्वत:च्या तीन बँक खात्यांतून व्यवहार केले. सायबर चोरट्यांनी विविध 30 बँक खात्यांवर पैसे जमा करून घेतल्याचे दिसून येत आहे. तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने केलेल्या गुंतवणुकीतून एकूण 64,80,500 रुपयांची फसवणूक झाल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत. रक्कम काढताना सायबर चोरट्यांनी साधला डाव सराफ व्यावसायिक जयेश नाईक यांना आरंभी फेसबुकवर फे्रंड रिक्वेस्ट आली. ती स्वीकारल्यानंतर क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली. नाईक यांनी हळूहळू गुंतवणूक वाढवली. दीड महिन्याच्या कालावधीत संशयित आरोपी व तक्रारदार यांच्यात दीड महिना संवाद सुरू होता. नफा वाढताना दिसत असल्याने नाईक यांनी गुंतवणूक वाढवली. वाढलेल्या पैशांसह ही रक्कम 1 कोटी 60 लाख दिसत असल्याने नाईक यांनी काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याचवेळी त्यांचे बँक खाते साफ झाले, अशी माहिती पोलिस निरीक्षक मोहिते यांनी दिली.