

डोंबिवली : प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांकडून होणारा त्रास असह्य झाल्याने तरूणीने तिची सारी व्यथा समाज माध्यमांवर व्हिडियोद्वारे मांडून स्वतःचे जीवन संपुष्टात आणले. ही धक्कादायक घटना टिटवाळ्यात घडली असून जोपर्यंत आरोपींवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा संतप्त कुटुंबीयांनी दिला आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सुमन मच्छिंद्र शेंडगे (32) असे या तरूणीचे नाव आहे. सुमन आणि सचिन शास्त्री यांचे गेल्या दहा वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. सचिन शास्त्री यांनी सुमनला तुझ्या सोबत लग्न करेन, असे आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु त्याने सुमनच्या नकळत पाच वर्षांपूर्वीच गायत्री नामक तरूणीशी लग्न केले. पती सचिन आणि सुमन या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती गायत्रीला समजली. त्यानंतर सचिन आणि कुटुंबियांकडून सुमनला त्रास देण्यास सुरूवात झाली. नेहमी फोन करून, तसेच प्रत्यक्ष समोर भेटून सचिन आणि त्याचे कुटुंबीय सुमनला वारंवार टार्गेट करत होते. सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळलेली सुमन मानसिकदृष्ट्या खालावून गेली होती. अखेर तिने जीवनाचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. राहत्या घरात सुमनचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत छताला लटकलेला आढळून आला. सुमनची अवस्था पाहून घरच्यांनी टाहो फोडून तिच्या जीवनयात्री संपविण्याच्या कारणास सचिन आणि कुटुंबियांनी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. कल्याण तालुका पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सुमनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवला आहे.
सुमनच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाने संताप व्यक्त करत तिच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या सचिन आणि कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत आरोपींना गुन्हा नोंदवून अटक केली जात नाही तोपर्यंत सुमनचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिला आहे. या घटनेनंतर सुमन राहत असलेल्या परिसरात संतापासह शोकाकुल वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची हमी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली असून या प्रकरणातील सर्व गुंतागुंतीचे मुद्दे उघडकीस आणण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.