

देवळा (नाशिक) : चांदवड तालुक्यातील दिघवदची घटना ताजी असतानाच फुलेमाळवाडी (ता. देवळा) येथील गोविंदा बाळकृष्ण शेवाळे (वय ४०) या तरुणाने पत्नी आणि दोन लहान मुले यांना संपवून स्वतःही फाशी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार (दि.३०) रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यावरु ही घटना शनिवार (दि.29) रोजी रात्री घडली असल्याचे स्पष्ट होत आहे.
व्हॉट्स ॲपवर 'भावपूर्ण श्रद्धांजली' असे स्टेट्स
गोविंदा शेवाळे यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सकाळी व्हॉट्स ॲपवर 'भावपूर्ण श्रद्धांजली' असे स्टेट्स टाकले होते. हे स्टेट्स शेवाळे यांच्या लहान भावाने पाहिले आणि त्याला काहीतरी अनुचित घडल्याची शंका आली. त्याने तात्काळ इतर नातेवाईकांना फोनद्वारे याची माहिती कळवली. त्यानंतर शेवाळे कुटुंबीयांच्या निवासस्थानी गेल्यावर भयानक घटना उघडकीस आली.
फॉरेन्सिक टीमकडून तपासणी
घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याने पोलिसांनी जमावाला नियंत्रित केले. हत्या की जीवनयात्रा संपवली, याबाबतच्या कारणांचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम तपासणी करणार आहे. स्वतःच्या मृत्यूचे संकेत देणारा 'भावपूर्ण श्रद्धांजली' हा स्टेटस पाहिल्यानंतर, ही घटना पूर्वनियोजित असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे.
यांचा नाहक बळी
या दुर्दैवी घटनेत कोमल गोविंद शेवाळे (वय ३५), खुशी गोविंद शेवाळे (वय ८), श्याम गोविंद शेवाळे (दीड वर्षे) यांचा बळी गेल्याने त्यांचे मृतदेह स्वतःच्या घरात आढळून आल्याची घटना रविवार (दि,30) रोजी आज सकाळी उघडकीस आली आहे.
या घटनेत युवक गोविंद शेवाळे याने स्वतः दोरीने फाशी घेऊन जीवनयात्रा संपवलीअसल्याचे दिसून येत आहे, तर पत्नी, एक मुलगी, एक मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे. पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्यासह पोलीस घटनास्थळी उपस्थित असून अधिक तपासासाठी फॉरेन्सिक टिमसह व्हॅन दाखल झाली आहे. या घटनेमुळे माळवाडी गावासह तालुक्यात खळबळ उडाली आहे .