

जळगाव (चोपडा): पुढारी ऑनलाइन डेस्क | प्रेमविवाहाच्या रागातून मुलीच्या वडीलांनीच मुलीवर गोळीबार केल्याने ती जागीच ठार झाली असून जावई गंभीर जखमी आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी गावातील सेवानिवृत्त सीआरपीएफ जवान किरण अर्जुन मंगले (वय 48) यांच्या मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून चोपडा येथे झालेल्या हळदीच्या कार्यक्रमात थेट जन्मदात्या मुलीवरच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात मुलगी तृप्ती मंगले ही जागीच ठार झाली असून, जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी किरण मंगले यांना बेदम मारहाण केली. यात तेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तृप्ती मंगले (मयत) हिने दोन वर्षांपूर्वी अविनाश ईश्वर वाघ (वय 28, रा. करवंद, ता. शिरपूर, सध्या रा. कोथरूड, पुणे) याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. हा विवाह किरण मंगले यांना मान्य नव्हता.
शनिवारी (दि. 26 एप्रिल) रोजी चोपडा शहरातील खाइवाडा जवळील आंबेडकर नगर येथे अविनाशच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमात तृप्ती आणि अविनाश सहभागी झाले होते. त्याच ठिकाणी किरण मंगले आले आणि त्यांनी अचानक गोळीबार केला. या गोळीबारात तृप्ती जागीच ठार झाली तर अविनाशच्या पाठीवर आणि पोटावर गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. संतप्त वऱ्हाड्यांनी किरण मंगले यांना चांगलाच चोप दिला. या प्रकरणी चोपडा पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.