Naxal leader thippari tirupati | गुरिल्ला वॉर : दि एन्ड..!

Naxal leader thippari tirupati |
Naxal leader thippari tirupati | गुरिल्ला वॉर : दि एन्ड..!
Published on
Updated on

जयंत निमगडे, गडचिरोली

ते वर्ष होतं 1982. ओठावर जेमतेम मिशी यायला लागलेला थिप्परी तिरुपती तत्कालीन आंध्र प्रदेशातील कोरुटला येथील महाविद्यालयात बारावीत शिकत असताना रॅडिकल स्टुडंटस् युनियनमध्ये सहभागी झाला. थिप्परीच्या कोवळ्या मनावर क्रांतीची बिजं इतकी रुजवली गेली की, दुसर्‍याच वर्षी तो पीपल्स वॉर ग्रुपचा सदस्य झाला. संघटनेनं त्याला गडचिरोलीच्या जंगलात पाठवलं. पाठीवरच्या दप्तराची जागा पिट्टूनं घेतली आणि लेखणीऐवजी हातात बंदूक आली. इथूनच थिप्परी तिरुपतीला लोक देवजी ऊर्फ देवण्णा या नावानं ओळखू लागले. चार दशकं माओवादी चळवळीत घालवून सुप्रिमो झालेल्या देवजीनं अलीकडेच पोलिसांच्या हातात शस्त्रे दिली, त्याची ही चित्तथरारक कहाणी...

1980 मध्ये कोंडापल्ली सीतारामय्या यांनी आंध्र प्रदेशात पीपल्स वॉर ग्रुपची स्थापना केली. ही संघटना म्हणजे मार्क्सवादी-लेनीनवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक कट्टरपंथी गट होता. सशस्त्र संघर्षाद्वारेच आपण लोकांना न्याय देऊ शकतो, असं या संघटनेची विचारधारा होती. त्यासाठी संघटनेनं सर्वप्रथम रॅडिकल स्टुडंटस् युनियनची स्थापना करून युवकांना टार्गेट केलं. या युनियननं वेगवेगळ्या ठिकाणी संमेलनं भरवून युवकांना क्रांतीचं स्वप्न दाखवलं. या स्वप्नांना तेव्हाच्या आंध्र प्रदेशातील अनेक युवक आणि विद्यार्थी भुलले. मुप्पाला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती, नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू ऊर्फ गगण्णा, मल्लोजुला कोटेश्वर राव ऊर्फ किशनजी, मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती अशा अनेक जणांचा त्यात सहभाग होता. त्यातील एक नाव होतं थिप्परी तिरुपती ऊर्फ देवजी ऊर्फ देवण्णा..!

कोण आहे देवजी..!

तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील कोरुटला गावातील डॉ.आंबेडकर नगरातील रहिवासी असलेला 64 वर्षीय थिप्परी तिरुपती हा माडिगा या दलित समुदायातील आहे. 1982 मध्ये बारावीत असताना तो करीमनगर येथील विद्यार्थ्यांच्या रॅडिकल स्टुडंटस् युनियन या क्रांतिकारी चळवळीशी जुळला. त्यानंतर 1983 मध्ये त्याने पीपल्स वॉर ग्रुपमध्ये प्रवेश केला. लगेच त्याला गडचिरोली जिल्ह्यात पाठवण्यात आलं. सुरुवातीलाच सिरोंचा दलममध्ये काम केल्यानंतर त्याला कमांडरपदी बढती मिळाली. एटापल्ली व पेरमिली दलमचा तो समन्वयक आणि विभागीय समिती सदस्य झाला. गडचिरोली जिल्ह्यात 15 वर्षे घालवल्यानंतर त्याला दंडकारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. नक्षल्यांनी 1996 मध्ये दंडकारण्यात पहिल्यांदा स्थापन केलेल्या प्लाटूनचा कमांडर होण्याचा मानही देवजीला मिळाला आणि मग त्यानं मागे वळून बघितलंच नाही.

2001 मध्ये त्याची केंद्रीय समितीचा सदस्य आणि सेंट्रल मिलिटरी कमिशनचा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. नक्षल चळवळीची माहिती देणारे ‘अवामी जंग’ हे नियतकालिकसुद्धा तो प्रकाशित करीत होता. गोव्यापासून केरळपर्यंत गुरिल्ला झोन स्थापन करण्यात देवजीनं महत्त्वाची भूमिका बजावली.

देवजी सर्वोच्च नेता झाला!

21 मे 2025 मध्ये छत्तीसगडच्या करेगुट्टा पहाडावर पोलिसांशी झालेल्या चकमकीत माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव तथा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू ठार झाला. त्यानंतर तिरुपती थिप्परी ऊर्फ देवजी यास राष्ट्रीय महासचिव बनविण्यात आले होते. परंतु, दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोच्च नेता मल्लोजुल्ला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याने आत्मसमर्पण केलं, बस्तरमधील खुंखार नक्षली माडवी हिडमा आणि त्याच्या पत्नीला छत्तीसगड पोलिसांनी कंठस्नान घातलं. त्यामुळे पोलिसांशी सामना करण्याची आपल्या संघटनेची ताकद राहिली नाही, असा साक्षात्कार झाल्यानं देवजीनं आत्मसमर्पण केलं आणि 43 वर्षे भूमिगत राहून दंडकारण्याला धगधगत ठेवणारी आग शांत झाली.

हिंसक घटनांचा मास्टरमाईंड!

सुरुवातीला लोकसहभाग वाढवून संघटना मजबूत करण्यावर भर देणारा देवजी मिलिटरी कमिशनचा प्रमुख झाल्यानंतर हिंसक घटनांच्या योजना आखून त्यांना अंजाम देत राहिला. विशेषत: छत्तीसगड राज्यात झालेल्या मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाईंड देवजी होता.

रानी बोदलीचा तो थरारक हल्ला!

15 मार्च 2007 ची रात्र. होळी आणि रंगपंचमीचा सण उलटून जेमतेम तीन दिवस झाले होते. बिजापूर जिल्ह्यातील रानी बोदली येथील कॅम्पमध्ये केंद्रीय राखीव दलाचे 55 जवान जेवण करून गाढ झोपले होते. तीन गटांतील नक्षल्यांनी पोलिसांच्या कॅम्पला घेरून जवळपास चार तास अंदाधुंद गोळीबार केला. स्फोटकांचा माराही सुरूच होता. या हल्ल्यात 55 जवान शहीद झाले. सडवा जुडूम हे आंदोलन जोरात असताना हा हल्ला झाल्याने सरकारला मोठा हादरा बसला. हा हल्ला एका महिला कमांडरच्या नेतृत्वात झाला होता. मात्र, भूभागाचा अभ्यास आणि हल्ल्याची योजना आखणारा देवजीच होता, असे गुप्तचर विभागाचे त्यावेळी म्हणणे होते.

धर्मरावबाबांच्या अपहरणाचा सूत्रधार!

राज्याचे माजी मंत्री आणि अहेरीचे विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम हे 1990 मध्ये तत्कालीन सिरोंचा मतदारसंघातून निवडून आले होते. 27 एप्रिल 1991 रोजी ते आलापल्ली-भामरागड मार्गावरील मेडपल्ली येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. तेव्हा नक्षल्यांनी धर्मरावबाबांचे अपहरण केले होते. तेव्हा एटापल्ली व पेरमिली दलमचा समन्वयक आणि विभागीय समिती सदस्य म्हणून काम पाहणार्‍या देवजी ऊर्फ देवण्णाच्या नेतृत्वातच हे अपहरण करण्यात आलं होतं. सोबत अहेरी दलमची कमांडर राधक्कादेखील होती. पुढे अथक परिश्रमानंतर धर्मरावबाबा आत्राम यांची सुटका करण्यात आली होती.

ताडमेटलात शहीद झाले 76 जवान!

रानी बोदलीच्या हल्ल्यापेक्षाही भीषणता दर्शविणारा ताडमेटला येथील हल्ला होता. 6 एप्रिल 2010 रोजी दंतेवाडा जिल्ह्यातील ताडमेटला येथून नक्षलविरोधी अभियान राबवून 150 पोलिस कॅम्पकडे परतत असताना घनदाट जंगलात लपलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर प्रचंड गोळीबार करून भूसुरुंग स्फोट घडविला. यात 76 जवान शहीद झाले. हा हल्लादेखील देवजीच्या गुरिल्ला वॉर रणनीतीचे यशस्वी उदाहरण होते. त्यानंतर अनेक ठिकाणी झालेल्या मोठ्या हल्ल्यांची आखणी देवजीनं केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news