kolhapur Crime News | कर्दनकाळ!

kolhapur Crime News |
kolhapur Crime News | कर्दनकाळ!File Photo
Published on
Updated on

दिलीप भिसे, कोल्हापूर

गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर मंदिर परिसरात अंगावर काटा आणणारा अन् मती गुंग करणारा धक्कादायक आणि जीवघेणा थरार कोल्हापूरकरांना प्रत्ययाला आला. केवळ मौजमजेसाठी नातवाने अंथरुणावर खिळलेल्या वयोवृद्ध आजीला चहातून विष देऊन तिचा जीव घेतला... मृतदेहावरील लाखो रुपये किमतीच्या दागिन्यांवर झडप घालून डल्ला मारला...

एखाद्या रहस्यमय चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल, अगदी त्याच पद्धतीने नातवाने थंड डोक्याने केलेल्या कृत्याचा कोल्हापूर पोलिसांनी भांडाफोड केला. संशयित प्रेम परशुराम भिऊंगडे (वय 20, रा. ज्ञानसागर रेसिडेन्सी, फुलेवाडी, रिंगरोड, कोल्हापूर) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शिवाजी पेठ येथील एका कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेणार्‍या तरुणाकडून हा अमानुष प्रकार घडल्याने समाजात तो एक चिंतेचा विषय बनला आहे. दिशाहीन झालेली अन् नशेच्या आहारी गेलेली कोवळ्या वयातील तरुण मुले कोणत्या थराला जाऊ शकतात, त्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल!

गंगावेश परिसरातील भिऊंगडे कुटुंबीयांतील बहुतांशी सदस्यांची सुवर्ण कारागीर अशीच ओळख आहे. या कुटुंबीयातील वयोवृद्ध सुवर्ण कारागीर मारुती भिऊंगडे यांचे डिसेंबर 2025 मध्ये निधन झाले. मारुती आणि उषा भिऊंगडे वयोवृद्ध दाम्पत्य ऋणमुक्तेश्वर मंदिर परिसरात परिचित... दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने मारुती यांच्या पश्चात त्याच्या पत्नी उषा यांची सुश्रूषा पुतणे परशुराम भिऊंगडे ( रा. फुलेवाडी, रिंगरोड, कोल्हापूर) करीत. अधून-मधून परशुराम शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये येऊन उषा यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत. औषधे आणून देत, डिसेंबरपासून हा नित्यक्रम सुरू होता. वडील एकीकडे वृद्ध चुलतीची सेवा करीत असताना दुसरीकडे संशयित प्रेम भिऊंगडे याच्या सुपीक डोक्यातून वेगळाच प्लॅन चालू होता.

आजीचा खजिना !

संशयिताच्या मित्रांचा गोतावळा वाढला होता. चार-चौघात मौजमजा करून चैनविलासी जीवनाची त्याला ओढ लागली होती. वडील चैनीसाठी त्याला पैसे देऊ शकत नव्हते. विनासायास पैसे कसे मिळतील, याच विचारात प्रेम होता. वयोवृद्ध आजी उषा यांच्याकडे दागिन्यांसह पैशाचा भरपूर खजिना असल्याचे त्याच्या डोक्यात अगदी फिट्ट होते; पण आजीकडील हा खजिना लुटायचा कसा, याचे त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह होते.

आजीच्या सेवेचा फार्स!

गंगावेश, ऋणमुक्तेश्वर मंदिर परिसर नेहमी गजबजलेला... शिवाय मंदिरामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ! मात्र, भिऊंगडे कुटुंबाव्यतिरिक्त वृद्धेकडे कुणाची वर्दळ नव्हती. त्यामुळे आजीकडील खजिना लुटायचा कसा, या विचारात संशयित होता. आजीने आरडा-ओरड केल्यास भांडाफोड होणार याचीही त्याला भीती होती. त्यामुळे आजीच्या सेवेचा फार्स करीत तिच्यावर विषप्रयोग करण्याचा त्याने प्लॅन केला.

चहातून विष!

सोमवारी (दि.16) सकाळी संशयित प्रेम घरी आला. येताना त्याने सोन्याला पॉलिस करण्यासाठी लागणारे मोरचूद हे केमिकल आणले. आरोग्याला घातक ठरणारे केमिकल चहातून दिल्यास काही मिनिटांत काम फत्ते...त्यानंतर लुटालूट... मौजमजा... असा संशयिताचा प्लॅन ठरला. वृद्धेला चहा देत असतानाच त्याने त्यात केमिकलचे मिश्रण केले. चहा पिल्यानंतर पंधरा-वीस मिनिटांत उषा भिऊंगडे तडफडू लागल्या. उचक्या देत देत त्यांनी प्राण सोडला.

संशयिताकडून दागिन्यांवर डल्ला

वृद्धेचा जीवाचा आकांत संशयित उघड्या डोळ्यांनी पाहात होता. दगडाचे काळीज बनलेल्या संशयिताने वृद्धेच्या शरीराची हालचाल थंडावल्यानंतर अंगावरील सारे दागिने काढून घेतले. हातातील पाटल्या त्याने लोखंडी पक्कडीच्या साहाय्याने ओढून काढण्याचा प्रयत्न केला. खोलीतील साहित्याची शोधाशोध केली. 13 लाख 75 हजारांचे 12 ते 13 तोळे दागिने हाताला लागल्यानंतर संशयित तेथून सहीसलामत निसटला.

अत्यंत थंड डोक्याने संशयिताने वृद्धेच्या खुनाचा प्लॅन फत्ते केला. कोणताही पुरावा ठेवला नाही. पोलिसांनाही काहीकाळ संशय आला नाही. वृद्धेचा हृदयविकाराच्या धक्क्यानेच मृत्यू झाला असावा, असे वातावरण निर्माण झाले. मात्र, वृद्धा उषा भिऊंगडे यांच्या संपर्कात असणार्‍या शेजारील काही महिलांना त्यांच्या मृत्यूविषयी शंका होती. हा खुनाचाच प्रकार असावा, अशी दबक्या आवाजात चर्चा होती. उत्तरणीय तपासणीतही वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत्यूचे नेमके स्पष्टीकरण न देता व्हिसेरा राखून ठेवल्याने संशय बळावला होता.

संशयित अचानक गायब !

लक्ष्मीपुरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची तपासाची चक्रे फिरत असताना नात्यातील प्रेम परशुराम भिऊंगडे मात्र मोबाईल स्विचऑफ करून अचानक गायब झाला होता. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, श्रीराम कण्हेरकर, सहायक निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे यांचा संशय बळावला. प्रेमला ताब्यात घेऊन त्याच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडले अन् शहरातील खळबळजनक खुनाच्या गुन्ह्याचा पथकाला छडा लागला.

सखोल चौकशीची मागणी

केवळ चैनीसाठी वृद्ध आजीला चहातून विष देऊन खून करणार्‍या आणि 13 लाख 75 हजारांचे दागिने घेऊन पसार झालेल्या नातवाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. थंड डोक्याने खुनाचा कट रचणार्‍या कटात प्रेमच्या आणखी काही साथीदारांचाही समावेश असावा, अशी परिसरात चर्चा आहे. पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवून रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news