

भिवंडी : संजय भोईर
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत प्रत्येकाला घर प्रत्येकाला निवारा ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी विविध योजना अंतर्गत निवारा नसणार्यांना घरकुल शासनाच्या निधीतून बनवून दिले जातात. अशाच एका घरकुल नसलेल्या कुटुंबास मोदी आवास योजनेतून घरकुल मंजूर झालं त्यासाठी शासना कडून एक लाख रुपयाचे अनुदान त्याच्या बँक खात्यात जमा झाले. घरकुल उभे राहिले. पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायतीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांच्या घरासमोर नारळ वाढवून गृहप्रवेश घडून आणला आणि अवघ्या काही दिवसातच गावातील धनदांडग्यांनी त्याच्या घरावर जेसीबीचा नांगर फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
देशात एकही कुटुंब बेघर राहू नये असे स्वप्न देशाचे प्रधानमंत्री पाहत असताना शासकीय निधीतून बनवलेले घरकुल धनदांडग्यांनी उध्वस्त केले आहे. यावर आता जिल्हा परिषद प्रशासन नक्की काय कारवाई करते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या कुरुंद ग्रामपंचायत क्षेत्रातील दळेपाडा येथील निवारा नसलेल्या सुदाम बाळू भोईर यांना कुरुंद ग्रामपंचायतीच्या शिफारसीने मोदी आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले. वेळोवेळी 15, 40 व 45 हजार असे एकूण 1 लाख रुपये सुदाम भोईर यांच्या बँक खात्यात ऑनलाइन जमा झाले. घरकुल उभे राहिले. 27 मार्च 2025 रोजी पंचायत समिती व स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये नारळ वाढवून सुदाम भोईर यांनी गृहप्रवेश केला. त्यानंतर अवघ्या आठवडे भरात 3 एप्रिल रोजी गावातील निळकंठ मारुती विशे व जितेंद्र वामन विशे यांनी जे सी बी च्या सहाय्याने हे घरकुल उध्वस्त केले. यावेळी त्यांना अडवण्यास गेलेल्या सुदाम यांना दोघांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ज्यामुळे सुदाम भोईर याचे घरकुलाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
या प्रकरणी सुदाम भोईर यांनी पडघा पोलिस ठाण्यासह गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिली असून घर उध्वस्त करणार्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदर घरकुल मोदी आवास योजनेतून मंजूर असून, अजून अनुदान रक्कम पूर्ण लाभार्थ्यास दिलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये घरकुल उध्वस्त केल्या प्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात ग्रामपंचायतीच्या वतीने तक्रार दिली आहे. त्यावर पोलिसांकडून उचित कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायतीचे ग्राम पंचायत अधिकारी नितीन देशमुख यांनी दिली आहे.