

सांगलीसारख्या एका शहरात घडलेली सात-आठ वर्षांपूर्वीची ही घटना..! एकाएकी मोटारसायकली चोरीस जाण्याच्या घटना घडू लागल्या होत्या. चौकात, रस्त्याकडेला, कार्यालयासमोर, अनेक बँका, सिनेमागृहांसमोर उभ्या केलेल्या मोटारसायकली प्रामुख्याने चोरीस जात होत्या. दुचाकी चोरीस गेलेल्या वाढत्या तक्रारींमुळे पोलिसदेखील चांगलेच अस्वस्थ झाले होते. पोलिस निरीक्षक मोहिते गुन्ह्यांचा छडा लावण्यात एवढे तरबेज; पण त्यांनादेखील या प्रकरणात काही माग लागत नव्हता. वरिष्ठांकडून तर रोज विचारणा आणि मीडियातून तर मोटारसायकल चोरीच्या बातम्या सारख्या येत होत्या; पण गाड्या चोरीस जाण्याच्या घटना काही केल्या कमी होत नव्हत्या. पोलिसांनी अगदी सराईत गुन्हेगारांकडे विचारणा केली, रेकॉर्डवरील दुचाकी चोरट्यांचा माग घेतला गेला; पण काहीच दूम लागत नव्हता; पण अगदी योगायोगानेच या चोरट्यांचा छडा लागला अन् समोर आले एक विदारक वास्तव..!
नेहमीप्रमाणे त्या दिवशी, मध्यरात्री हवालदार जाधव एकटेच मोटारसायकलवरून नेमून दिलेल्या भागात गस्त घालत होते. नेहमी बरोबर असणारे कॉन्स्टेबल नाईक आज रजेवर होते. त्यामुळे एकटेच फिरत फिरत ते चौकात आले. या चौकाला वेढा घालून परत माघारी चौकीत जाऊन दिवस उगविण्याची वाट पाहायची हा त्यांचा बेत होता. मात्र, या सार्या बेतावर पाणी फिरले. चौकापासून काही अंतरावर एका गल्लीत आतील बाजूस अंधारात त्यांना दोघे अगदी अल्पवयीन तरुण एक दुचाकी सुरू करण्यासाठी खटपट करताना दिसले. त्यांच्या पोलिसी मनात शंकेची पाल चुकचुकली.
त्यांनी त्या तरुणांकडे जाण्यास सुरुवात केली; पण त्यांना येताना पाहून त्या तरुणांनी पळण्यास सुरुवात केली. त्या दोघांपैकी पळून जाण्यात एकजण यशस्वी ठरला; पण दुसर्याला मात्र जाधव यांनी पकडले. त्यांचा संशय चांगलाच बळावला. त्यांनी लगेचच पोलिस ठाण्यात निरोप देऊन गाडी मागवून घेतली. पाच मिनिटांत गाडी चौकात आली. पकडलेल्या तरुणाला घेऊन सारा लवाजमा ठाण्यात आला. काही वेळातच निरीक्षक मोहिते हेदेखील आले. त्यांनी या तरुणाकडे चौकशी केली; पण सुरुवातीला त्याने काही दाद दिली नाही; मात्र ‘प्रसाद’ मिळताच मात्र तो पटापटा बोलू लागला.
सुजित, नितीन, रमेश, संतोष यांची शाळेत असल्यापासून जिवलग दोस्ती. प्रत्येकाची घरची स्थिती चांगली. आई-वडील सुशिक्षित. सुजितचे वडील शहरालगतच्या एका लहानशा कारखान्यात नोकरीला. नितीनचे वडील शेती करत. रमेशच्या वडिलांचे मार्केट यार्डात छोटेसे दुकान होते. संतोषचे वडील तर शिक्षक होते. मुले अभ्यासात हुशार... पण त्यांना हळूहळू चैनीचे जणू व्यसन लागले. मिळणारा पॉकेटमनी कधी संपायचा ते कळायचेदेखील नाही.
एकीकडे वाढती चैन आणि दुसरीकडे चैनीला कमी पडू लागलेला पैसा. यामुळे अस्वस्थ झालेल्या संतोषने एकदा जवळच्या शहरातून एक मोटारसायकल चोरून आणली आणि त्यांना जणू ताजा पैसा देणारी सोन्याची कोंबडीच सापडली. चोरलेली मोटारसायकल धाडसाने त्याने एका शेतमजुराला कमी पैशात विकली आणि ती चोरी पचली! एक चोरी पचली म्हटल्यावर या चौघांनी मग दुचाकी चोरून विकण्याचा सपाटाच लावला. मात्र, यासाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेस असलेल्या शहराची निवड केली. चौघेही नवीनच असल्याने रेकॉर्डवर नव्हते, त्यामुळे पोलिसांनादेखील ते लवकर सापडत नव्हते. मात्र, योगायोगाने यातील एकजण चाणाक्षपणा दाखविणार्या हवालदार जाधव यांच्या नजरेस पडला आणि केवळ योगायोगानेच एक मोटारसायकली चोरणार्या कोवळ्या तरुणांची टोळीच पोलिसांच्या ताब्यात आली.
या चौघांकडे अधिक तपास केला असता, पोलिसांना शहरात चोरीस गेलेल्या अनेक मोटारसायकली कोणास विकल्या याचा छडा लागला. पोलिसांनी या अल्पवयीन गुन्हेगारांना न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने आपली कामगिरी चोख बजावत या कोवळ्या तरुणांना योग्य ती शिक्षा दिली. केवळ चैनीसाठी मोटारसायकली चोरून आपल उगवते आयुष्य गजाआड घालवण्यास गेलेल्या या कोवळ्या तरुणांवर संस्कार करण्यात त्यांचे आई-वडील कमी पडले असतील काय, हा सवाल संवेदनशील समाजमनास आजदेखील भेडसावतो आहे.