

नाशिक : धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धेजवळील सुमारे दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने तोतया पोलिसांनी चोरून नेल्याची घटना इंदिरानगर येथे घडली.
फिर्यादी कमल तुमाराम भदाणे (७०, रा. सेव्हनस्टार अपार्टमेंट, राणेनगर) या शुक्रवारी (दि.११) सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास ब्रह्माकुमारीच्या ओम शांती शिबिरासाठी गुरु गोविंदसिंग कॉलेजच्या समोरील रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी पोलिस असल्याची बतावणी केली. तसेच भदाणे यांच्या गळ्यात असलेली २० ग्रॅम वजनाची सुमारे ८० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, दहा ग्रॅमच्या ४० हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, दोन लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या असे सुमारे तीन लाख ७० हजार रुपये किंमतीचे दागिने कागदात गुंडाळून देण्याचा बहाणा केला. तसेच त्यापैकी एक कागद फिर्यादीच्या बॅगेत टाकून त्यांची फसवणूक केली. त्यानंतर हे तोतया पोलिस दुचाकीने आदित्य हॉलच्या दिशेने निघून गेले. कमल भदाणे यांना आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाणे गाठत दोघा भामट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिस तपास करीत आहेत.