

नाशिक : मद्य, एमडी, गुटखा यात बनावटीकरण करून त्याची विक्री होत असल्याचे प्रकार शहरात याआधी उघडकीस आले आहेत. त्यानंतर आता संशयितांनी सिगरेटमध्येही बनावटीकरण केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नाशिक रोड, सरकारवाडा पोलिस ठाण्यांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील रहिवासी यशवंत जनार्दन गोसावी (४२) यांच्या फिर्यादीनुसार, नाशिक रोड पोलिसांनी कारवाई करीत १ लाख १४ हजार ७५० रुपयांचा बनावट सिगरेटचा मुद्देमाल जप्त केला. संशयित आदित्य कोरडे याचे नाशिक रोड येथील सुभाष रोडवर संकेत सेल्स होलसेल दुकान आहे. या दुकानात बनावट सिगरेट विक्री होत असल्याची माहिती गोसावी यांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. शहानिशा केल्यानंतर दुकानात बनावट सिगरेटचा साठा आढळला. चौकशीत कमी पैशांत जास्त नफा कमावण्यासाठी संशयिताने सिगरेटचे बनावटीकरण आणि साठेबाजी केल्याचे उघड झाले.
याप्रकरणी नाशिक रोड पोलिस अधिक तपास करीत आहेत, तर अमोल चंद्रशेखर बहुलेकर (४५, रा. पुणे) यांच्या फिर्यादीनुसार, कामगारनगर येथील रहिवासी मधुसूदन सुंदरलाल धुत (३२) याने रविवार कारंजा येथील धुत ट्रेडर्स दुकानात बनावट सिगरेटचा साठा करून त्याची विक्री केली. संशयित धुत याने कायदेशीर अधिकार नसतानाही एका सिगरेट कंपनीच्या नावे बनावट सिगरेटचा साठा जवळ बाळगून त्याची विक्री केली. या दुकानातून पोलिसांनी ४० हजार ८२० रुपयांचा बनावट सिगरेटचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात धुतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.