

अशोक मोराळे, पुणे
त्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री पुणे दौर्यावर होते. त्यामुळे पोलिस त्यादिवशी बंदोबस्तात व्यस्त होते. त्यादिवशी सकाळी सकाळीच पुण्यात एक बातमी वार्यासारखी पसरली. घरी आलेल्या कुरिअर बॉयने एका आयटी अभियंता असलेल्या तरुणीच्या घरात घुसून, तिच्या तोंडावर स्प्रे मारून बलात्कार केल्याची ती बातमी होती. घटनेचे गांभीर्य पाहता स्वतः पोलिस आयुक्तांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तळ ठोकला होता. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस असा पाचशेपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचार्यांचा फौजफाटा आरोपीच्या मागावर होता. अखेर पोलिसांनी तरुणीच्या घरी आलेल्या त्या व्यक्तीला शोधून काढले. मिळालेली माहिती पोलिसांना देखील चक्रावणारी होती. काय होती ती माहिती...?
कोंढव्यात दोन जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती एका तरुणीने कोंढवा पोलिसांना दिली. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती आपल्या घरी आली. त्याने मला ‘तुमचे कुरिअर आले आहे. माझ्याकडे पेन नाही़ पेन आणता का’, असे म्हटले. त्यामुळे मी पेन आणायला वळल्यावर तो मागे आला. त्यानंतर मात्र त्या तरुणीला काहीच कळले नाही. जेव्हा तिला जाग आली तेव्हा रात्रीचे आठ वाजून 35 मिनिटे झाली होती. तिच्या अंगावर अर्धवट कपडे होते. तिने मोबाईल अनलॉक करून पाहिला असता मोबाईलच्या स्क्रीनवर कुरिअर घेऊन आलेल्या व्यक्तीसोबतचा अर्धनग्न अवस्थेतील फोटो दिसला. त्या फोटोवर अक्षेपार्ह असा मजकूर लिहिला होता. ‘हे कोणाला सांगितले तर सर्व फोटो लिक करेन, पुन्हा येईन तयार राहा’, असे लिहिले होते. मोबाईलमध्ये दोन फोटोही दिसत होते.
तरुणीने पोलिसांना अशी तक्रार देताच पोलिसांनी 3 जुलैला तत्काळ गुन्हा दाखल केला. दरम्यान, यापूर्वी बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार आणि स्वारगेट एसटी स्थानक बलात्कार अशा दोन घटना पुण्यात घडल्या होत्या. एव्हाना वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत ही माहिती गेली होती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती. शिवाय महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
आता पोलिसांसमोर गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकण्याचे आव्हान उभे ठाकले होते. पोलिस आयुक्तांपासून इतर सर्व वरिष्ठ अधिकारी स्वतः या प्रकरणात लक्ष ठेवून होते. गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी तर कोंढव्यात तळ ठोकला होता. पाचशेपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी या तपासात गुंतले होते.
जो तो आपापल्या पद्धतीने आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न करत होता. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही कॅमेर्यांची पाहणी करण्यापासून खबर्यांचे जाळे गतिमान करण्यात आले होते. काहीही करून लवकरात लवकर आरोपीला पकडण्याचा चंग पोलिसांनी बांधला होता. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणाचा आढावा घेतला जात होता. तरुणीने पोलिसांना आरोपी कुरिअर बॉय असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी शहरातील संशयित कुरिअर बॉयची उचलबांगडी गेली. तिच्याकडे आलेला आरोपी सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला होता. पोलिसांनी तिला तो फोटो दाखविला. काही सेकंद गडबडत तिने आपण याला ओळखत नसल्याचे सांगितले. परंतु याचवेळी तिचे अडखळणे पोलिसांनी अचूक हेरले होते. काही तरी प्रकरणात गडबड असल्याचे पोलिसांना समजले होते. पण तसे काही न दाखवता त्यांनी आपले काम सुरू ठेवले.
पाचशेपेक्षा अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी आरोपीच्या मागावर होते. सोसायटीपासून ते बाणेरपर्यंत पोलिसांनी तब्बल 500 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तरुणी राहात असलेल्या सोसायटीतील सर्व रहिवाशांना तरुणाचा फोटो दाखविला. अशा प्रकारची व्यक्ती आपल्या कोणाच्या घरी आली होती का, असे विचारले. त्यावेळी रहिवाशांनी आपल्याकडे असे कोणीच आले नसल्याचे सांगितले.
आपल्यावर बलात्कार झाल्याचा दावा करणारी तरुणी चालाख होती. तिने पोलिसांना तपासासाठी मोबाईल देण्यापूर्वी काही डेटा डिलिट केला होता. परंतु पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणात डिलिट केलेली माहिती परत जमा केली. तरुणीच्या मोबाईलमधील मेसेज पाहिले असता तिनेच तरुणाला (मित्राला) घरी येण्याची परवानगी दिली होती. एक जुलै रोजी केलेल्या व्हॉटसअप चॅटप्रमाणे तिने तरुणाला घरी कोणी नसताना एक्स्ट्रा कपडे घेऊन येण्याबाबत सांगितले होते. तसेच येण्याच्या मार्गाबाबत पूर्वीप्रमाणेच ये असे सांगितले. त्यावरून आरोपी हा कुरिअर बॉय नसून तो फिर्यादी तरुणीचा मित्र असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले.
पोलिसांना आता फक्त तपासाचे धागे उलगडत जाण्याचे काम होते. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनाही तिने आपल्या तोंडावर स्प्रे मारल्याचे खोटे सांगितले. असा कोणताच स्प्रे तिच्या तोंडावर मारण्यात आला नव्हता. तिने घटना घडल्यानंतर रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी शुद्धीवर आल्यावर स्वत:चा फोन हातात घेऊन पाहिला असे तक्रारीत नमूद केले. मात्र प्रत्यक्षात अर्धनग्न अवस्थेतील फोटो तरुणाने तिच्या मोबाईलवरून तिच्या संमतीने 2 जुलैच्या रात्री 7 वाजून 53 मिनिटांनी काढलेले होते. आरोपी हा सोसायटीच्या लिफ्टमधून ग्राऊंड फ्लोअरला येऊन मेन गेटमधून 8 वाजून 27 मिनिटांनी बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले. परंतु तरुणीने फोनवरून काढण्यात आलेला फोटो हा 8 वाजून 27 मिनिटे व 53 सेकंदांनी एडिट करून त्यावर मेसेज टाईप केला होता. हा मेसेज तरुणीने स्वत:च टाईप केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तरुणीच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर केला असता त्यामध्ये तरुणीने तरुणासोबतचा काढलेला मूळ फोटो, ज्यामध्ये दोघांचाही चेहरा स्पष्ट दिसत होता. तो फोटो पोलिसांच्या हाती लागला. तो फोटो तरुणीने स्वत: क्रॉप व एडिट करून त्यात आरोपीचा चेहरा दिसू नये, त्याद्वारे तपासामध्ये संदिग्धता निर्माण व्हावी, म्हणून त्यात जाणूनबूजून फेरबदल करून मोबाईलवर ठेवला होता. तरुणीने तिचा मोबाईल पोलिसांना तपासासाठी देण्यापूर्वी मूळ फोटो डिलिट केले. आरोपीची ओळख पटू नये, म्हणून स्वत:च्या मोबाईलमध्ये फोटो एडिट करून ठेवले. सीसीटीव्हीमधील आरोपीचा फोटो दाखविल्यावर तरुणीला तो माहिती असतानाही तिने त्याला ओळखत नसल्याचे सांगितले. पोलिसांनी तांत्रिक तपासानंतर मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर या व्यक्तीचा शोध लावला. या तरुणीने केलेले गैरकृत्य हे तिने हेतुपुरस्सर व जाणीवपूर्वक केल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले.
त्यामुळे कोंढवा पोलिसांनी तरुणीवर खोटी माहिती देणे, खोटे पुरावे तयार करणे, त्याचा वापर करून पोलिसांना अधिकाराचा गैरवापर करण्यास प्रवृत्त करणे अशा (भारतीय न्याय संहिता कलम 212, 217, 228, 229) प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. तरुणीने कितीही पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी अखेर तिच्या कथित बलात्कार प्रकरणाचे बिंग फोडून सत्य बाहेर आणले. केवळ सत्य बाहेर आणून पोलिस थांबले नाहीत, तर तिच्यावर गुन्ह्याची नोंद देखील केली.