माणूस रागाच्या भरात काय करतो हे सांगता येत नाही. अशाच एकाने रागाच्या भरात पत्नीचा खून केला आणि अपघाताचा बनाव रचला. पण कायद्याच्या तीक्ष्ण नजरेसमोर त्याचा हा बनाव कोसळून पडला, त्याची ही कथा…
सोलापूर जिल्ह्यातील एका गावात घडलेली ही घटना. संतोषचा नांदेड जिल्ह्यातील एका गावातील ऊसतोड मजूर असलेल्या दूरच्या नात्यातील चारचौघींमध्ये उठून दिसणार्या शिवानीशी वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. संतोष पंढरपूर तालुक्यातील एका गावात आपल्या कुटुंबासह राहत होता. उदरनिर्वाहाच्या दृष्टीने गावोगावी भटकंती करावी लागत असल्याने तो कुटुंबापासून विभक्तच राहत होता. गळीत हंगामाच्या काळात तो गावातील टोळीबरोबरच ऊसतोड मजूर म्हणून विविध ठिकाणी जात होता. सुरुवातीला दोघांचाही सुखाने संसार चालला होता. आता आर्थिक चणचण भासू लागल्याने तसेच तिलाही ऊसतोडीची माहिती असल्याने तीही संतोषबरोबर ऊसतोडीसाठी जाऊ लागली. दरम्यान ऊस तोडणीची टोळी दुसर्या गावात आली. ऊसतोडीच्या निमित्ताने संतोष-शिवानीनेही गाव सोडले. पण आपल्या गावातून ऊसतोडीसाठी बाहेरगावी आल्यानंतर शिवानीच्या वागण्या-बोलण्यात अचानक बदल झाल्याचे जाणवू लागले. सुरुवातीला संतोषने दुर्लक्ष केले. पण ती संतोषपेक्षा टोळीत रमू लागली होती. टोळीतील तरुणांशी हसत-खेळत गप्पा मारत ती दिसू लागल्याने ही बाब संतोषच्या मनात खटकत होती.
शिवानीला संतोषने समजावून पाहिले. पण त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष तिने केले. संतोषच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. शिवानीचे दुसर्या कोणाशीतरी सूत जुळले असावे, असेही संतोषला वाटू लागले. यातूनच दोघांमध्ये भांडण व्हायची. संतोष याच कारणावरून शिवानीला मारहाणही करायचा. माहेरी आल्यानंतर शिवानीने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली. त्यांनी शिवानीचीच समजूत काढून हंगाम संपल्यावर बघू, असे सांगितले.
शिवानीच्या वागण्यातील बदल सहन न झाल्याने संतोषने शिवानीच्या भावाजवळ ही बाब मोबाईलवरून कळवली. दोघात काहीतरी कुरबूर सुरू असल्याचा अंदाज शिवानीच्या भावाने बांधला. मोबाईलवरून संभाषण साधत त्याने 'शिवानीला मारू नका, आम्ही तिची समजूत घालतो, सर्व काही ठीक होईल,' असे सांगितले.
एके दिवशी संतोष शिवानीला मोटारसायकलवरून निर्जन ठिकाणी फिरावयास घेऊन गेला. 'या गोष्टीचा आता सोक्षमोक्ष लावायचाच' असा मनात निश्चय करून त्याने शिवानीला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा तिने 'टोळीतील एका तरुणावर माझा जीव जडला आहे' असे सांगितले. संतोषचा पारा चढला. त्याने रागाच्या भरात जवळचा एक लाकडी ओंडका घेऊन शिवानीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान त्याला एक लोखंडी सळई सापडली. त्याने त्या सळीचा डोक्यात प्रहार केला. या प्रहाराने ती निपचित पडली. संतोष भानावर आला. त्याला काय करावे हे सुचेना. मग त्याने आपल्या टोळीतील मुकादमास अपघात झाल्याची व त्यात शिवानी गंभीर जखमी झाल्याची माहिती कळविली. मुकादमने संतोषसह शिवानीला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान शिवानीच्या घरच्यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी रुग्णालय गाठले, त्यावेळी शिवानीची अवस्था गंभीर होती. उपचाराला प्रतिसाद न देता शिवानीचा शेवटी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरांनी मंगळवेढा पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घडल्या प्रकाराविषयीची माहिती दिली.
सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाने यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात गाठले. त्यांनी शिवानीच्या मृतदेहाची पाहणी केल्यानंतर अंगावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या. डोक्यात अवजड वस्तूचा प्रहार केल्याचेही त्यांना दिसून आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला. नातेवाईकांचेही जबाब नोंदवून घेण्यात आले. संतोषकडे पोलिसांनी चौकशी केली. अपघाताचे स्थळ पाहिले. पण त्याठिकाणी अपघाताच्या कोणत्याही खानाखुणा दिसून आल्या नाहीत. शवविच्छेदनाच्या अहवालात दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या शिवानीचा जबर मारहाणीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
अपघाताचा बनाव संतोषच्या अंगलट आला होता. त्याने शिवानीचा गंभीर जखमी करून खात्मा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेले ओंडके, सळई पोलिसांनी जप्त करून या गुन्ह्याच्या आरोपाखाली संतोषची कारागृहात रवानगी केली.