

नाशिक : महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे सन २०२४ मध्ये प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक म्हणून रूजू झालेल्या उपनिरीक्षकाने सोमवारी (दि. १७) दुपारी साडेतीनच्या सुमारास गळफास घेत जीवनयात्रा संपवली.
सोमेश्वर भानुदास गोरे (२८, रा. बीड) असे या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. जीवन संपवण्याचे कारण अस्पष्ट असून, गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासास सुरुवात केली आहे.
बीड येथील धोंडगाई गावचे मूळ रहिवाशी असलेले सोमेश्वर गोरे यांनी सोमवारी (दि.17) रोजी जीवनयात्रा संपवल्याचे उघडकीस आले. गोरे यांचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले असून, अभ्यासिकेत दिवसरात्र अभ्यास केल्यानंतर सन २०२० मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली.
दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाल्यापासून ते एमपीएमध्ये वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारामुळे ते प्रशिक्षण वर्गात ते हजर राहू शकले नाहीत. तसेच रुग्णालयातून वसतिगृहात आल्यानंतर दुखापतीमुळे त्यांना बाह्य वर्गात हजर राहता येत नव्हते. त्यामुळे साेमेश्वर चिंतेत असल्याचे कळते. दरम्यान, गोरे यांच्या जीवन संपवल्याच्या ठिकाणी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. यासह त्यांच्या जीवन संपवण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.