

नाशिक : अन्नपदार्थांत लसणाचे महत्त्व असल्याने त्यास सर्वाधिक मागणी असते. त्यातच लसणाचा भाव ४०० रुपये किलोवर गेल्याने सर्वसामान्य नागरिकांनी लसणाचा वापर काटकसरीने सुरू केला आहे.
लसणाचे भाव वाढताच त्यावर चोरट्यांचीही नजर पडल्याचे समोर आले आहे. पंचवटी येथील बाजार समितीतील बंद दुकानातून चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांचा ११०० किलो लसूण चोरला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
आवक घटल्याने लसणाने भाव खाल्ला आहे. ४०० रुपये किलोपर्यंत त्याचे दर गेल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे. मात्र भाववाढ झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनीही लसणाला लक्ष केल्याचे पंचवटी बाजार समितीत समोर आले आहे. मखमलाबाद येथील रहिवासी तुषार माणिक कानकाटे (३४) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे बाजार समितीमध्ये ४० क्रमांकाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातातून १० ते ११ नोव्हेंबरदरम्यान चोरट्यांनी ११०० किलो वजनाच्या लसणाने भरलेल्या २२ गोण्या चोरल्याची घटना घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कानकाटे यांनी पंचवटी पोलिसांकडे तीन लाख ५० रुपयांच्या लसणाची चोरी झाल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. लसणाची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर इतर व्यावसायिकांनी माल सुरक्षित ठेवण्यावर भर दिला आहे. तर पोलिसांनीही बाजार समिती परिसरात गस्त वाढवली आहे.
गेल्या वर्षी सातपूर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटमधून ३० किलो लसणाची गोणी पळविल्याची घटना घडली होती. त्यावेळी लसणाचा भाव प्रतिकिलो सुमारे २५० रुपयांपर्यंत होता. यंदा लसूण महागल्याने पुन्हा चोरी झाल्यामुळे पोलिसांनी ठरावीक चोरट्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.