अनेक बालकं जेव्हा माझ्या दवाखान्यात येतात तेव्हा प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आणि चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे असतात. काही बाळं आणि मुलं-मुली हे घाबरल्याचा चेहरा करतात. काही जण काहीच रिअॅक्शन देत नाहीत, तर काही जण आरडाओरडा करतात, चिडतात; पण काही जणांची एक गोष्ट मात्र लक्ष वेधून घेणारी असते. ती म्हणजे प्रचंड आरडाओरडा, भयंकर संताप आणि माझ्यासमोरच थयथय नाचणे, हातवारे करणे आणि आलेल्या आई- बाबांना मारहाण करणे! जेव्हा त्यांना स्वतःच्या भावना कंट्रोल करता येत नाहीत, तेव्हा ते दीर्घकाळ त्याच भावनिक अवस्थेमध्ये राहतात आणि ही भावनिक अवस्था अतिशय त्रासदायक आणि धोकादायक बनते कारण या अवस्थेमध्ये ज्या हातात येतील त्या वस्तू भिरकावून देऊ लागतात. कोणी त्यांना हात लावला, तर हाताला चावू लागतात आणि ज्यांनी त्यांना आणलेलं आहे, त्यांचे केस धरून जोरजोरात ओढू लागतात.
हे एक असे धोकादायक लक्षण आहे, ज्याला म्हणतात लहानग्यांचं टोकाचं भावनिक असंतुलन. इमोशनल डिसरेग्युलेशन. हे जे भावनिक असंतुलन असतं, ते बरंच काही सांगत असतं. तसं पाहिलं, तर सामान्य मुलांमध्ये तणावाच्या आणि कसोटीच्या प्रसंगात भावनांवर नियंत्रण नसू शकतं; पण ते फार काळ टिकत नाही आणि पुढच्या वेळी ते त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतात; पण भावनिक असंतुलन असलेल्या मुला-मुलींची बातच न्यारी असते. त्यांना त्यांच्या भावनांवर दीर्घकाळ नियंत्रण ठेवता येत नाही. काही जण तर तासन् तास रागाच्या अवस्थेमध्ये किंवा दुःखाच्या अवस्थेमध्ये राहतात. त्यांना कोणत्या भावना दाटून आलेल्या आहेत, कोणत्या भावना वाहताहेत हेच कळत नाही, ओळखू शकत नाही. त्यांचा हा भावनिक स्फोट अनेकांना चित्रविचित्र वाटतो.
एक आई सांगत होती की, बाबांनी मारले म्हणून त्यांची मुलगी रात्रभर रडत होती. रागाने बेभान झालेली बाळं ही बऱ्याच वेळा भिंतीवर डोकं आपटून घेतात, इजा होईल की नाही याची पर्वा करत नाहीत. कुठल्यातरी वस्तूंनी स्वतःला इजा करून घेतात किंवा हातात येईल त्या वस्तूंनी दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न करतात. भिरकावतात. म्हणजे स्वतःला किंवा दुसऱ्याला मारणे, या टोकापर्यंत हे भावनिक असंतुलन असते.
सामान्यतः होणारे भावनिक असंतुलन हे मुलं-मुली मोठे होत जातात तसतसे कमी होत जाते. काही वेळा अतिशय वाईट अशी घरातली परिस्थिती असते, तेव्हा तेवढ्यापुरते ते निर्माण होत असते. ज्या मुला- मुलींचे पालक हे डिप्रेशन किंवा निराशा, विकृतीने ग्रस्त असतात तेव्हा त्यांनादेखील परिस्थिती कशी हाताळावी याविषयी माहिती नसल्याने त्यांच्यात कोणत्याही कृतीत सारखे अपयश येऊन डिप्रेशन येण्याची शक्यता काही पटीने वाढते.
खुद्द पालकच जेव्हा आपल्या भावना या टोकाच्या व्यक्त करू लागतात तेव्हा मुलांवर तेच संस्कार होतात आणि त्यांनाही भावनांवर नियंत्रण करणे जड जाऊ लागते. असे पालक हे आपल्या मुलांशी जोडून घेणं टाळत असतात किंवा त्यांना मुला-मुलींची ओढ वाटत नसते. जर पालकांना ती ओढ वाटली नाही, तर ती मुलांनाही वाटत नाही आणि त्यांच्यामध्ये कोणताही बॉण्ड तयार होत नाही आणि असा बॉण्ड तयार झाला नाही, तर अटॅचमेंट डिसऑर्डर किंवा पालकांविषयी काहीच भावना न वाटणे निर्माण होते आणि त्यातून एक प्रकारचा बेदरकारपणा त्यांच्या स्वभावामध्ये तयार होत जातो.
या ठिकाणी मुलांच्या ज्या भावनिक गरजा असतात, त्या भागवणे गरजेचे असते; पण त्या जर भागविल्या गेल्या नाहीत, त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले किंवा त्यांच्या भावनांना किंमत दिली गेली नाही, तर त्यांच्यामध्ये भावनिक स्फोट होत राहतात. अशीच गोष्ट ज्या पालकांमध्ये एकमेकांत भांडणे होतात त्या घरातही घडते. बऱ्याच वेळा मुला-मुलींना आपल्या मित्र-मैत्रिणींच्या भावना कळत नाहीत आणि आपण त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांना कसा प्रतिसाद द्यावा, हेदेखील कळत नाही. यात सामाजिक घटकसुद्धा अंतर्भूत असतात. त्यातून भावनिक असंतुलन निर्माण होते. अचानक घरातली आपली काळजी घेणारी व्यक्ती किंवा पालक वारले, तर त्या वेळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर दुःख निर्माण होते आणि त्यातून मानसिक, भावनिक असंतुलन तयार होते.
अशी मुले-मुली हे अवघड वाटणाऱ्या कामांना टाळाटाळ करू लागतात किंवा तेथे ते कमी वेळ देऊ लागतात. आपल्या आई-वडिलांचे न ऐकणे सुरू होते किंवा मोठ्यांना वाट्टेल तसे बोलणे घडू लागते. आपल्या भावनांना लवकर थंड करण्यात त्यांना वारंवार अपयश येते. नकारात्मक भावना ते मोठ्या प्रमाणात साठवून राहिलेले असतात. बऱ्याच वेळा भावना निर्माण होऊ लागल्या की, ते अस्वस्थ होतात आणि ती स्थिती त्यांना नकोशी वाटत असते. अशा वेळी ते एक तर पळून जाऊ इच्छितात किंवा आक्रमक होतात. एक प्रकारचा सणकीपणा त्याच्यात निर्माण होता.
अशी मुले-मुली जेव्हा वयात येतात तेव्हा भावनिक असंतुलन हे त्यांच्या अनेक मानसिक रोगाचे लक्षण बनते; जसे की निराशा विकृती किंवा डिप्रेशन, काळजी विकृती, आघातानंतरची ताण विकृती, बायपोलर मानसिक विकृती, काठावरची व्यक्तिमत्त्व विकृती, नशा-पाणी व अमली पदार्थांचे सेवन करणे, खाण्यापिण्याच्या विकृती आणि मूड असंतुलनाची विकृती. जर या रोगांचे ते लक्षण तीव्र बनले तर त्यातून स्वतःला इजा करून घेणे, आत्महत्या करणे, आत्महत्येचे प्रयत्न करणे आणि अतिशय गंभीर असे घातक लैंगिक वर्तन करणे आढळून येते. वयात आल्यानंतर यांचे आलेले सर्व नातेसंबंध हे बिघडलेले राहतात. तणावाच्या परिस्थितीत तर ते अशा नात्यांमध्ये विचित्र वागतात किंवा टोकाचे विघातक वर्तन करतात.
भावनिक नियंत्रण आणि निरामय संवादकौशल्ये या दोन्ही गोष्टी आपल्याला सुरक्षित नातेसंबंध देत असतात कारण त्यामध्ये एकमेकांना आधार देणे सहज घडते. नकारात्मक गोष्टींना घालवण्याचे प्रयत्न केले जातात; पण टोकाच्या भावनिक असंतुलनामध्ये नवरा-बायकोमध्ये सातत्याने बिघाड राहिलेला आढळतो. एकमेकांवर सातत्याने घणाघाती आरोप करणे चालू राहते. बऱ्याच वेळा त्यातून हिंसा घडते. कोणतीही इंटीमसी राहत नाही. सेक्समधला इंटरेस्ट कमी असतो. लैंगिक अत्याचार करून खून करणे या गोष्टी लहानपणापासूनच्या टोकाच्या भावनिक असंतुलनामुळे घडत असतात. गलिच्छ किंवा शिव्यायुक्त शब्द वापरणे आणि हिंसा घडवणे हे भावनिक असंतुलितांचे शस्त्र असते.
भावनिक असंतुलन जर असेल तर कॉझिटिव्ह बिहेव्हियर थेरपी ही खूप चांगल्या पद्धतीने कौन्सिलिंगमधून उपयोगी पडते. त्यात जोडीने काही वेळा ए.डी.एच.डी. किंवा अतिकडमडेपणा या रोगाबरोबर हे लक्षण असल्याने औषधांचासुद्धा उपयोग करावा लागतो. लहानपणी मेंदूस झालेल्या इजेमुळे जर हे लक्षण उद्भवले, तर त्याला वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते. जर लहानपणी मुला-मुलींचा लैंगिक छळ झाला असेल, तर त्यांना कौन्सिलिंगची अत्यंत आवश्यकता असते, भावनिक असंतुलन जर सामाजिक अविष्कारात घडू लागले, तर संपूर्ण समाज धोकादायक अवस्थेत राहतो व त्यातून दंगली व हिंसाचार समाजाच्या वाट्यास येतात. बालपणीचे हे भावनिक असंतुलनाचे अंकुर वेळीच छाटणे महत्त्वाचे आहे !