Elderly murder case | पैशांची चटक अन् रक्ताचे डाग! पैशांच्या हव्यासापोटी एका वृद्धेचा निर्घृण बळी

Elderly murder case |
Elderly murder case | पैशांची चटक अन् रक्ताचे डाग! पैशांच्या हव्यासापोटी एका वृद्धेचा निर्घृण बळीFile Photo
Published on
Updated on

गणेश गोडसे, बार्शी

बार्शी तालुक्यातील हत्तीज या गावचा चांगदेव हा तरुण शहरात शिक्षणासाठी आला होता. शहरातील गंगुबाई या वृद्ध महिलेने आपला वडिलकीचा हात चांगदेवच्या डोक्यावर ठेवत त्याला आपल्याकडे भाडेकरू म्हणून जागा दिली. दरम्यान, तो तरुण बार्शी शहरात शिक्षणाबरोबरच शेअर बाजारासारखे इतर उद्योग करू लागला. त्यामधून कधी त्याला नफा, तर कधी तोटा होऊ लागला; मात्र चांगदेवला शेअर बाजारातून अल्पावधीत पैसे कमवून मोठे होण्याचा मोह काही केल्या सुटत नव्हता.

चांगदेव शेअर बाजारामध्ये पूर्णपणे काम करू लागला; मात्र त्याला शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली. त्यासाठी त्याने त्याच्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून व जवळच्या लोकांकडून पैशाचा व्यवहार सुरू केला; मात्र जिथे पैशाचा विषय येतो, तिथे जवळचेही दूर जातात. त्यानुसार त्याने उसनवार घेतलेल्या पैशांची त्याच्याकडे मागणी होऊ लागली. त्यामुळे त्रस्त झालेला चांगदेव कुठेतरी पैशांचा मेळ लावला पाहिजे या विचारांमध्ये होता. दरम्यान, तो पूर्वी ज्या वृद्ध महिलेकडे भाड्याने राहत होता व जिने त्याला अगोदर आपल्या घरी आसरा देऊन आधार दिला होता, त्या गंगुबाईची त्याला आठवण झाली. त्यानुसार त्याने गंगुबाईच्या घरी जाऊन त्यांना तो भाड्याने राहत असलेल्या दुसर्‍या घरी येण्यास सांगितले. दरम्यान, जुना ओळखीचा भाडेकरू असल्याने गंगुबाई यांनीही चांगदेव या तरुणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून चांगदेव भाड्याने राहत असलेले ते घर गाठले. इकडे त्या चांगदेवच्या डोक्यात बरेच काही नियोजन सुरू होते. त्याचा संपूर्ण आराखडा तयार झाला होता. त्याची बुद्धी गंज चढलेल्या अवस्थेत गेली असल्याने आपण किती क्रूर कृत्य करणार आहोत, याची जाणीव त्याला होत नव्हती.

वृद्ध गंगुबाई चांगदेवच्या त्या घरी गेल्यानंतर चांगदेव याने त्यांना सरबतमध्ये आठ झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे गंगुबाई या बेशुद्ध अवस्थेत गेल्या. त्यानंतर चांगदेवने रुमाल गंगुबाईच्या नाकावर दाबून त्यांचा निर्दयी खून केला. त्यानंतर मृतदेहाच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले व घरामधील काळ्या रंगाच्या पोत्यामध्ये मृत गंगुबाई यांचा मृतदेह घालून आपल्या कारच्या डिकीमध्ये तो नेऊन ठेवला. ठरल्याप्रमाणे सर्व घडत होते. त्याने त्या मृतदेहाची कुठे व कशी विल्हेवाट लावायची याचेही आखाडे बांधून ठेवलेले होते. त्यानुसार तो आपल्या कारमधील मृतदेह घेऊन बार्शी ते कुर्डुवाडी राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरे गावाजवळील आरडा ओढा येथील घनदाट झाडांच्या गर्दीत गेला व मृतदेह असलेले पोते तेथे ठेवून दिले व काम फत्ते झाल्याच्या आविर्भावात तो फिरू लागला.

मात्र, नियतीचा व निसर्गाचा डोळा कायम सुरू असतो. याचाच प्रत्यय इथेही आलेला आहे. गंगुबाईच्या घरी दुपारी चांगदेव गेला होता व त्यानंतर काही वेळातच गंगुबाई या घराला कुलूप लावून बाहेर पडल्या होत्या, हा प्रकार गंगुबाईच्या घरालगतच्या एकाने पाहिला होता. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चांगदेवला हेरले व त्याच्याकडे तपास सुरू केला. सुरुवातीला गंगुबाई हरविल्याची तक्रार दाखल करण्यासाठी व त्यांच्या शोधासाठी चांगदेवच प्रयत्न करत होता; मात्र पोलिसांनी तो राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली. तेव्हा गंगुबाई चांगदेवच्या घरात जाताना दिसते; मात्र बाहेर आलेली सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नव्हती. नेमके पोलिसांना इथेच चांगदेव याच्यावर शंका वाढत गेली. अखेर चांगदेवला पोलिसी खाक्या दाखवताच चांगदेव हा पोपटासारखा बोलू लागला. आपणच शेअर बाजारात आलेल्या तोट्यामुळे व लोकांची देणे झाल्यामुळे गंगुबाई यांच्या अंगावरील असलेल्या सोन्याच्या पाटल्या व इतर सोन्यासाठी खून केल्याचे त्याने कबूल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news