

नाशिक : सतीश डोंगरे
सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक अधिष्ठान असलेली नाशिक ‘कुंभनगरी’ आता ड्रग्ज माफियांच्या विळख्यात सापडली आहे. मुंबई, गुजरात आणि सांगली येथील ड्रग्ज माफियांच्या टोळ्यांनी नाशिकला आपले केंद्र बनवले असून, येथून केवळ राज्यभरातच नव्हे, तर परराज्यांतही नशेचा काळाबाजार फोफावत आहे. ललित पाटील प्रकरणाने या गंभीर वास्तवावर शिक्कामोर्तब केलेच; पण पोलिसांच्या आकडेवारीतून समोर येणारे चित्र त्याहूनही भयावह आहे.
गेल्या तीन वर्षांत नाशिक पोलिसांनी तब्बल 710 किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत, ज्यात 17 किलो घातक एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जचा समावेश आहे. या जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत जवळपास 12 कोटी रुपये आहे. याप्रकरणी 100 गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी 206 पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, ही कारवाई केवळ हिमनगाचे टोक असून, या रॅकेटचे मुख्य सूत्रधार म्हणजेच ‘आका’ अजूनही मोकाट असल्याचे चित्र आहे.
नाशिकमधील वाडिवर्हे येथे एमडी ड्रग्जचा कारखाना उघडकीस आल्यानंतर या सिंडिकेटची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे समोर आले. ललित पाटील, भूषण पाटील आणि ‘छोटी भाभी’ यांचे कनेक्शन सांगलीपासून थेट दुबईपर्यंत पोहोचल्याचे तपासात उघड झाले. या माफियाला काही राजकारण्यांचे पाठबळ मिळत असल्यामुळेच धर्मनगरीत नशेचा व्यापार वेगाने वाढत असल्याचा आरोप होत आहे.
मुंबई आणि ठाण्यातील एमडी ड्रग्जचे कारखाने पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यानंतर, माफियांनी आपला मोर्चा राज्याच्या इतर शहरांकडे वळवला. विशेषतः, धार्मिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शहरांना लक्ष्य केले जात आहे. सध्या नाशिक आणि सांगली ही ड्रग्ज सिंडिकेटची प्रमुख केंद्रे बनली असून, येथूनच पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांसह सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ड्रग्जची साखळी चालवली जात आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी एमडी ड्रग्ज विकणार्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वास्तविक, सोशल मीडियामुळे ड्रग्ज विकणे पेडलर्सना सोपे झाले आहे. पूर्वी ड्रग्ज कुठे मिळते, हे सहज कळत नसे; पण आता त्याची माहिती सहज उपलब्ध होते.
सुशीला कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नाशिक
गोरगरीब तरुणांचा वापर : माफियांकडून शहरातील गोरगरीब आणि बेरोजगार तरुणांना पैशाचे आमिष दाखवून ‘ड्रग्ज पेडलर’ म्हणून वापरले जात आहे.
महिला पेडलर्सचा सुळसुळाट : पोलिसांच्या कारवाईत अटक झालेल्या 206 पेडलर्सपैकी तब्बल 126 महिला आहेत. पती ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात गेल्यानंतर या महिलांनी स्वतःच सूत्रे हाती घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नागपूरमध्येही घरातून एमडी विकणार्या महिलेला अटक करण्यात आली होती.
आंतरराज्यीय टोळ्या सक्रिय : महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमधून ड्रग्जची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. या आंतरराज्यीय टोळ्यांना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.