Dr Valsangkar Death Case | डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येमागे कोण?

हॉस्पिटलमध्ये तिचीच ‘ताईगिरी’
Dr Shirish Valsangkar Death Case
शिरीष वळसंगकर, मनीषा मुसळे-माने(Pudhari Photo)
Published on
Updated on

संजय पाठक : सोलापूर

सोलापुरातील मोदी स्मशानभूमीच्या अगदी जवळच एकेकाळी काटेरी वनस्पतींचे माळरान होते. या माळरानावर वळसंगकर परिवाराने भव्य रुग्णालयाच्या रूपाने अक्षरशः नंदनवन उभे केले. ज्या परिसरात दिवसा जायला भीती वाटावी, असा भाग डॉ. शिरीष वळसंगकरांमुळे अक्षरशः गर्दीचा, मोठ्या प्रमाणावर व्यवसायाचा पॉर्ईंट ठरला.

डॉ. शिरीष यांच्या प्रचंड बुद्धमत्तेच्या जोरावर पेशंटांचाही रुग्णालयात ओघ वाढू लागला. हळूहळू माळरानाचे रूपांतर एखाद्या मार्केट परिसरामध्ये झाले. रिक्षा स्टॉप, हॉटेल्स, कॅन्टीन, मेस, विविध दुकाने, स्ट्रीट फूडचे स्टॉल्स यामुळे हा परिसर अक्षरशः गजबजून जाऊ लागला. डॉ. शिरीष यांची कीर्ती दिवसेंदिवस वाढू लागली. सोलापूर शहर जिल्ह्यासह धाराशिव, लातूर, कलबुर्गी, विजापूर, सातारा, अहिल्यानगर या परिसरातूनही रुग्ण सोलापुरात डॉ. शिरीष यांच्याकडून उपचार करून घेण्यासाठी येऊ लागले. डॉक्टरांचा दिवसरात्र राबता होताच, तरी दिमतीला अनेक ज्युनिअर, सीनिअर डॉक्टरांचीही भरती डॉ. शिरीष यांनी करून घेतली. त्यानुसार हॉस्पिटलचा स्वतःचा ऑक्सिजन प्लांट, अनेक प्रकारचे ऑपरेशन थिएटर्स उभा केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास 99 टक्क्यांपेक्षा अधिकच, म्हणजे जवळपास शंभर टक्के इतपत. त्यातच डॉक्टर मधूनच अन्य मोठ्या शहरातही किचकट शस्त्रक्रियेसाठी स्पेशल हेलिकॉप्टरने जाऊ लागले. एकूणच यामुळे डॉ. शिरीष यांचा बोलबाला वाढू लागला. तसा पैसाही खुळखुळू लागला.

पैसा एकटा येत नसतो, तो जसा समृद्ध घेऊन येतो, तसाच येताना तो त्रास, मनस्ताप अन् अनामिक भीती हे सवंगडीही घेऊन येतो. येथेही डॉ. शिरीष यांच्या बाबतीच हेच झाले. हॉस्पिटल मॅनेजमेंटसाठी डॉ. शिरीष यांनी मनीषा मुसळे-माने या जुन्या सहकारी महिलेस जरा जास्तीचे अधिकार दिले. मात्र हळूहळू ‘चहा पेक्षा किटली गरम’ असा प्रकार मनीषाच्या बाबतीत होत गेला. हळूहळू ती इतर सर्व कर्मचार्‍यांवर रुबाब दाखवण्यासाठी अनेक निर्णय डॉक्टरांच्या परस्पर घेऊ लागली. तिच्या पगाराच्या तुलनेत तिचा बंगला डॉक्टरांच्या बंगल्या इतकाच मोठा निर्माण करण्यात तिने यश मिळवले.

हॉस्पिटलमध्ये तिची ‘ताईगिरी’ वाढत असतानाच डॉ. शिरीष यांचा चिरंजीव डॉ. अश्विन यांची रुग्णालयात एंट्री झाली. तो ही मेंदूरोग तज्ज्ञ असल्याने त्याने डॉ. शिरीष यांच्या प्रॅक्टिसला हातभार लावण्यास आरंभ केला. या दरम्यान अश्विनची पत्नी डॉ. शोनालीनेही हॉस्पिटलमध्ये एंट्री घेतली. डॉ. शोनाली महत्त्वाकांक्षी असल्याने तिने नवर्‍यासह स्वतःचे महत्त्व हॉस्पिटलमध्ये वाढण्यासाठी डॉ. शिरीष यांच्या जुन्याजाणत्या कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखवणे, त्यांना मनस्ताप देणे यासारख्या गोष्टी सुरू केल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

वर्चस्ववादाची लढाई!

अशा वळवणावर डॉ. शिरीष यांच्या घरात कौटुंबिक कलहाची ठिणगी पडली. कारण, हॉस्पिटलमधील स्टाफमध्ये जणू दोन गट पडल्यासारखे झाले. काही जण डॉ. शिरीष यांच्या बाजूला, तर काहीजण डॉ. शोनाली यांच्या गोटात. कारण, प्रत्येकाला आपल्या नोकरीची चिंता होती. यात काहींनी दलबदलूपणा केला. यातून डॉ. शिरीष यांच्या कुटुंबात कलह वाढू लागला. त्यातच काहींना डॉ. शिरीष यांनी, तर काहींना डॉ. अश्विन आणि डॉ. शोनाली यांनी कमी केले. हॉस्पिटलच्या अर्थ सत्तेवर डॉ. शोनाली यांनी वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली.

जर तुम्ही मला परत कामावर घेतले नाही तर...

त्यातच हॉस्पिटलमधील जुनी जाणती महिला कर्मचारी मनीषा मुसळे-माने हिने थेट डॉ. शिरीष यांनाच धमकावण्यास आरंभ केला. तसे मेल तिने डॉ. शिरीष यांना पाठवले. मला पुन्हा कामावर घ्या, माझा पगार सुरू करा, यासह विविध मागण्या करत तिने काही मेलमध्ये डॉ. शिरीष यांना धमकी दिली की, जर तुम्ही मला परत कामावर घेतले नाही तर मी जाळून घेईन, अन् तुमच्या नावे चिठ्ठी ठेवेन. समाजात प्रतिष्ठा असलेले, हळव्या मनाचे डॉ. शिरीष या मेलच्या धमक्यांमुळे मनातून हादरले. त्यातच कौटुंबिक कलहही वेगात होता. स्नुषा डॉ. शोनाली व कुटुंबातील अन्य सदस्यांकडूनही डॉ. शिरीष यांना मानसिक त्रास दिला जात होता. वर्ल्ड टूर करण्याची इच्छा बाळगणार्‍या, अफाट जनसंपर्क असलेल्या, प्रचंड हुशार असलेल्या डॉ. शिरीष यांच्या मनामध्ये या सर्व प्रकारामुळे एकप्रकारची अस्वस्थता निर्माण झाली. अर्थसत्ता गेली, स्वतः उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करण्यास मज्जाव, महिला अधिकार्‍यांचे धमकीचे मेल, कौटुंबिक सदस्यांचे हेकेखोर वागणे यामुळे डॉ. शिरीष पुरते हातबल झाले, खचले, निराश झाले होते. अखेर शुक्रवारी, दि. 18 एप्रिल रोजी डॉ. शिरीष यांनी रात्री बाथरूमध्ये स्वतःच्या मालकीच्या पिस्टलमधून दोन गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. नेमकी गोळी कुठे लागल्यावर त्वरित मृत्यू होऊ शकतो याची पुरेपूर जाण असणार्‍या डॉ. शिरीष यांनी बरोबर मेंदूच्या चिंधड्या उडतील, अशा पद्धतीनेच गोळ्या झाडून घेतल्या. अन् मेंदू रुग्णांसाठी देव असणार्‍या डॉ. शिरीष यांनी स्वतःच्या मेंदूवर गोळी झाडून घेत त्या मेंदूच्या चिंधड्या करत आत्महत्या केली. यामुळे सोलापूरचे डॉक्टरविश्व, रुग्ण अन् समस्त सोलापूरकर अक्षरशः सुन्न झाले. त्यादिवशी सर्वांच्या तोंडी एकच वाक्य होते, डॉक्टर, तुम्ही सुद्धा..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news