Drugs : डंकी ड्रग्ज रूट!

डंकी ड्रग्ज रूट!
Crime diary
डंकी ड्रग्ज रूट!Pudhari photo
Published on
Updated on
सुनील कदम

गेल्या चार-पाच वर्षांत जगभरात अमली पदार्थांचा व्यापार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय भूमीचा वापर होत असल्याची बाब अधोरेखित होऊ लागली आहे. काही स्थानिक तस्करांच्या मदतीने जगभरातील ड्रग्ज माफिया नव्याने ‘ड्रग्जचा डंकी रूट’ तयार करण्याच्या कामाला लागलेले दिसत आहेत. परिणामी, भारतातही ड्रग्ज सेवन करणाऱ्याची संख्या बळावत चालली आहे. कठोर उपाययोजना करून हा ‘ड्रग्जचा डंकी रूट’ उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे.

गेल्या काही वर्षांपासून जगभरातच अमली पदार्थांच्या तस्करीचा व्यवसाय वाढत आहे. भारतात येणार्‍या ड्रग्जपैकी 40 टक्के ड्रग्ज स्थानिक बाजारपेठेत वापरले जातात; परंतु उर्वरित 60ड्रग्ज भारतातून अरबस्तान आणि आफ्रिकेत जात असल्याची बाब जगभरातील पोलिस यंत्रणांच्या आणि इंटरनॅशनल नार्कोटिक कंट्रोल ब्यूरोच्या तपासातून पुढे आलेली आहे. भारतातील विविध भाग हे जागतिक ड्रग्ज व्यापाराचे प्रमुख मार्ग म्हणून उदयास येऊ लागले आहेत.

आतापर्यंत युरोपातील अनेक देश आणि प्रामुख्याने अमेरिका ही ड्रग्जची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जात होती; परंतु गेल्या काही वर्षांत अनेक अरब देश उदयोन्मुख बाजारपेठ म्हणून उदयास आले आहेत. अरेबियन देशांमध्ये ड्रग्जचा खुलेआम व्यापार करणे जोखमीचे असल्यामुळे जागतिक ड्रग्ज माफिया या व्यापारासाठी भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांचा वापर करताना दिसत आहेत. या माध्यमातून भारतातून सुमारे 2 ते 5 लाख कोटी रुपयांच्या ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची बाबही इंटरनॅशनल नार्कोटिक कंट्रोल ब्यूरोच्या तपासातून पुढे आलेली आहे. भारतात एनसीबी आणि इतर केंद्रीय संस्था सातत्याने कारवाई करत असतानाही दिवसेंदिवस ड्रग्जचा व्यापार फोफावताना दिसत आहे.

हा आहे ‘डंकी ड्रग्ज रूट’!

गुजरात, महाराष्ट्र आणि केरळच्या समुद्रकिनार्‍याचा ड्रग्ज डिलिव्हरीसाठी मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे म्यानमारच्या सीमा ओलांडून ईशान्येकडील राज्यांमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा होतानाही दिसत आहे. स्थानिक बाजारपेठेतून पुढे या ड्रग्जला आंतरराष्ट्रीय बाजारात पाय फुटताना दिसत आहेत.

मणिपूरमधील मोरे आणि मिझोराममधील चंपाई ही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज व्यापारातील मोठी केंद्रे समजली जात आहेत. येथून ड्रग्जच्या स्थानिक वापराबरोबरच देशाच्या इतर भागातही त्याचा पुरवठा केला जातो.

कसे चालते ड्रग्ज सिंडिकेटचे काम?

जगभरातील ड्रग्ज सिंडिकेटस् ही प्रामुख्याने लोकल पेडलर्स (किरकोळ पुरवठादार) यांच्यावर आधारित असतात. या किरकोळ पुरवठादारांपर्यंत पोहोचल्यानंतर सिंडिकेटस् या पुरवठा पाईपलाईनमधून बाहेर पडतात. ड्रग्जच्या विक्रीतून होणारा नफा पुढे वेगवेगळ्या टप्प्यांवरील व्यापार्‍यांना जातो.

मोठ्या कारवाया!

अलीकडेच ऑस्ट्रेलियन पोलिसांनी एक मोठे ड्रग्ज रॅकेट पकडले होते. या रॅकेटचा भारतातील ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा संशय आहे. दोन आठवड्यांपूर्वी भारतीय नौदलाच्या तटरक्षक दलाने 6 हजार किलो ड्रग्ज बंगालच्या उपसागरातून जप्त केले होते. हे मेथॅम्फेटामाईन (मेथ) या नावाचे ड्रग्ज होते. चालू वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई होती. तसेच तटरक्षक दलाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मेथ ड्रग्ज जप्त करण्याची ही पहिलीच वेळही होती. चार-पाच दिवसांपूर्वी तटरक्षक दलानेच पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातून जवळपास पाच हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. या सगळ्या घटना विचारात घेता, भारतातील वेगवेगळ्या प्रांतांतून आणि प्रामुख्याने समुद्रकिनारी भागातून ‘ड्रग्जचा डंकी रूट’ जात असल्याचे स्पष्ट होते.

6 हजार किलो ड्रग्ज!

काही दिवसांपूर्वी पोर्ट ब्लेअरच्या पूर्वेला सुमारे 150 कि.मी. अंतरावर असलेल्या बॅरॉन बेटावर कोस्ट गार्ड गस्ती विमानाला संशयास्पदरीत्या तरंगत असलेला एक फिश ट्रेलर सापडला होता. तटरक्षक दलाच्या जहाजाने या ट्रेलरला वेढा घातला असता या ट्रेलरमधून ड्रग्जची प्रत्येकी दोन किलोची तीन हजार पाकिटे जप्त करण्यात आली होती, म्हणजे तब्बल 6 हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या पॅकेटमध्येही मेथ नावाचेच ड्रग्ज होते. याप्रकरणी म्यानमारमधील सहा तस्करांनाही अटक करण्यात आली आहे.

3,300 किलो ड्रग्ज!

याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात अमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातच्या किनारपट्टीवरून 3,300 किलो ड्रग्ज जप्त केले होते. बंगालच्या उपसागरात जप्त करण्यात आलेल्या जप्तीपूर्वी ही वर्षातील सर्वात मोठी ड्रग्ज जप्तीची कारवाई होती. नोव्हेंबरमध्ये इराणच्या जहाजातून 700 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

या सगळ्या बाबी विचारात घेता आंतरराष्ट्रीय आणि काही स्थानिक ड्रग्ज माफियांनी भारताच्या सागरकिनारी भागातून जगभरात जाणार ‘डंकी ड्रग्ज रूट’ वापरात आणल्याचे स्पष्ट होते. या ड्रग्जला मोठ्या प्रमाणात स्थानिक बाजारपेठेतही पाय फुटू लागले आहेत. त्यामुळे हा ‘डंकी ड्रग्ज रूट’ पक्का होण्यापूर्वीच कठोर उपाययोजना करून तो उखडून टाकण्याची आवश्यकता आहे.

जागते रहो’चा नारा आवश्यक!

31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने जगभरातील अनेक देशांमध्ये पार्ट्या आणि जल्लोषाला उधाण येते. अशा पार्ट्यांमधून वेगवेगळ्या ड्रग्जचा नुसता महापूर वाहत असतो. साहजिकच, मागणी तसा पुरवठा या न्यायाने नेमक्या याच कालावधीत ड्रग्जचा जागतिक व्यापारही फोफावतो. त्यामुळे या काळात भारतीय तटरक्षक दलाला आणि अमली पदार्थविरोधी पथकांना डोळ्यात तेल घालून ‘डंकी ड्रग्ज रूट’वर पहारे बसवावे लागतील.

Crime diary
Pudhari Crime Diary : कुटुंब कलह : पहिला आघात महिलांवरच!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news