Digital Arrest Scam | डिजिटल अरेस्टचा बनाव!

सायबर भामट्यांनी त्यांना लाखो रुपयांचा गंडा घालायचा प्लॅन केला होता.
Digital Arrest Scam
डिजिटल अरेस्टचा बनाव!(Pudhari File Photo)
Published on
Updated on

निखिल रोकडे, नाशिक

नाशिक शहरात वाढत्या डिजिटल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणार्‍या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आणले आहे. संभाषण, धमक्या, बनावट अधिकारी, व्हिडीओ कॉलवरील नियंत्रण या सर्वांचा संगनमताने रचलेला गुन्हेगारांचा सापळा एखाद्या गुन्हेगारी वेब सीरिजसारखाच होता; मात्र या कथेला निर्णायक वळण देत नाशिक पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून 10 लाखांची फसवणूक रोखली.

भीतीचा पहिला कॉल : सकाळची वेळ होती. घरात शांतता होती आणि अचानक आलेला एक कॉल! समोरचा आवाज अत्यंत अधिकाराने बोलत होता. ‘तुमच्या नावाने कॅनरा बँकेत एक खाते आहे. या खात्यावरून तब्बल 540 कोटींचा व्यवहार झालेला आहे. हा सगळा व्यवहार दहशतवादी संघटनांशी करण्यात आलेला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला डिजिटली अरेस्ट करत आहोत. यापुढे आम्ही सांगेपर्यंत अजिबात हलायचे नाही, कुठे जायचे नाही, कुणाशी बोलायचे नाही, अन्यथा गंभीर परिणाम होतील’ अशा धमकीबाज शब्दांनी त्या दाम्पत्याच्या पायाखालची जमीन सरकली. बोलणार्‍याच्या आवाजातील जरब आणि कायद्याची भाषा ऐकून हे नक्कीच कुणीतरी पोलिस असावेत, याबाबत त्यांची जणू काही खात्री झाली आणि अलगदपणे ते सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत गेले.

नियंत्रित बंदिवास : पहिल्या कॉलनंतर सायबर चोरट्यांनी लगेचच त्यांना व्हिडीओ कॉल करून कॉलवरच राहण्यास सांगितले. यादरम्यान या दाम्पत्याला घराचे सगळे दरवाजे बंद करण्यास सांगण्यात आले. तसेच जोपर्यंत कॉल चालू आहे, तोपर्यंत कॅमेर्‍यासमोरून हलू नका, असे सतत धमकवण्यात येत होते. पती-पत्नींपैकी एकाने कायमस्वरूपी मोबाईलच्या स्क्रीनवर राहणे सायबर चोरट्यांनी त्यांना अनिवार्य केले. दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे असे आदेश देत तब्बल 12 तास या सायबर चोरट्यांकडून त्या वृद्ध दाम्पत्याचा मानसिक छळ सुरू होता. कधी बनावट ईडी अधिकारी, कधी सीबीआय, तर कधी न्यायालयातील अधिकारी. प्रत्येक वेळी नवे चेहरे आणि नवी धमकी दिली जात होती.

शेवटचा डाव : सायंकाळ होताच सायबर गुन्हेगारांचा त्या वृद्ध जोडप्याला अंतिम आदेश आला. ‘तुमच्या सर्व खात्यांतील पैसे आमच्या सिक्रेट अकाऊंटवर ताबडतोब पाठवा. नाही तर आयुष्यभर जेलमध्ये जाऊन बसा.’ गुन्हेगारांच्या या धमकीमुळे ते पापभीरू जोडपे पुरते घाबरून गेले आणि त्यांनी गुन्हेगारांना 10 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली; पण त्यावेळी त्यांच्याकडे एवढी मोठी रक्कमच नव्हती. त्यामुळे त्यांनी कुठूनतरी पैसे जमा करून ते सायबर चोरट्यांना देण्यासाठी हालचाल सुरू केली.

उसनवारीसाठी फोन : आता कुणाकडे एवढे पैसे मागायचे, याचा विचार सुरू असतानाच या जोडप्याला आपल्या विवाहित मुलीची आठवण झाली आणि त्यांनी मुलीकडून 10 लाख रुपये उसने मागायचे ठरविले. त्यानुसार त्यांनी आपल्या मुलीला फोन लावला; पण मुलीशी फोनवर बोलत असताना आपले आई-वडील प्रचंड घाबरलेले आहेत, हे त्यांच्या आवाजावरून तिने लगेच ओळखले. तिने तातडीने ही बाब आपल्या पतीला सांगून नक्कीच काहीतरी गडबड असल्याची शंका बोलून दाखविली. शिवाय यामध्ये काहीतरी काळेबेरे असल्याची आशंकाही व्यक्त केली. त्यामुळे मुलीच्या नवर्‍याने सासू-सासर्‍यांच्या आवाजातील भीती आणि कोणत्यातरी अनामिक संकटाची भीती ओळखून तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली.

Digital Arrest Scam
Crime Diary Nashik | दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दे दणादण....

पोलिसांची क्षणात कारवाई : नाशिक सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने ते त्या कुटुंबाच्या घरी पोहोचले. वातावरणातील तणाव ओळखून त्यांनी दाम्पत्याला शांत केले. त्यांच्या मोबाईलवरील चॅट, कागदपत्रे तपासून त्यांनी स्पष्ट सांगितले की, ही पूर्णतः फसवणूक आहे. कोणत्याही सरकारी यंत्रणेत ‘डिजिटल अरेस्ट’ नसते. इतके ऐकल्यानंतर त्या दाम्पत्याने गुन्हेगारांशी संपर्क तोडला आणि अखेर त्यांचा लाखोंचा गंडा टळला.

Digital Arrest Scam
Crime Diary : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण : व्यवस्थेचा बळी!

सायबर जागरूकता : डिजिटल युगात भीती पसरवून पैसा उकळण्याची ही नवी गुन्हेगारी पद्धत धोकादायक वेगाने वाढत आहे. या घटनेने उच्चशिक्षित, व्यावसायिक लोकसुद्धा अशा जाळ्यात फसू शकतात, हे सिद्ध केले. नाशिक पोलिसांच्या वेगवान कारवाईने फक्त एक कुटुंब नाही, तर शहरातील अनेक नागरिकांसाठीही यातून धडा दिला गेला आहे. फोनवरील आवाजाला सरकारी अधिकार समजू नका. शंका आली की, पोलिसांशी संपर्क साधा, हे सूत्र आता अशा प्रसंगांमध्ये लक्षात ठेवायला हवे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news