

धुळे : धुळे शहरातील आझाद नगर परिसरातील कापडाच्या दुकानात चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली. आझाद नगर पोलिस ठाण्याच्या शोध पथकाने ही कारवाई करत चोरीस गेलेला मुद्देमाल आणि मोटारसायकल जप्त केला आहे.
नयन विनोद थोरात यांच्या कापड दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निवृत्ती पवार यांनी शोध पथक सक्रिय केले. पोलीस कर्मचारी योगेश शिरसाठ, गौतम सपकाळे, संदीप कढरे, शांतीलाल सोनवणे, रफीक पठाण, योगेश शिंदे, मनोज बागुल, अनिल शिंपी, मक्सूद पठाण, पंकज जोंधळे यांच्या पथकाने आझाद नगर परिसरात गुप्त माहितीदारांच्या मदतीने तपास सुरू केला असता, शाहरुख शेख शब्बीर मेहतर व कय्युम शेख मोहम्मद या दोघांनीच चोरी केल्याची कबुली दिली. निळा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एमएच-१८ बीएस-९६०६ या मोटारसायकलसह थांबले असताना पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला.