Dhule News | लक्षात घ्या! बालकामगार आढळल्यास होईल तुरुंगवासाची शिक्षा
धुळे : कोणत्याही उद्योग, व्यवसाय किंवा आस्थापनांमध्ये १४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा असून, असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची तरतूद आहे.
दोषी आढळल्यास संबंधित मालकास ६ महिने ते २ वर्षांपर्यंत तुरुंगवास, तसेच २० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास ही शिक्षा १ ते ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास, तसेच किमान १० हजार रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतात, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांनी दिली.
बालकामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा अधिनियम, २०१६ च्या तरतुदीनुसार, १४ वर्षांपेक्षा लहान मुलांना कोणत्याही प्रकारच्या कामावर ठेवणे गुन्हा आहे. तसेच १४ ते १८ वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योग वा प्रक्रियांमध्ये रोजगार देणे हा फौजदारी गुन्हा आहे. धुळे जिल्ह्यात हॉटेल, चहा टपरी, दुकाने, आस्थापना, विटभट्टी, खडीक्रशर आदी ठिकाणी बालकामगार आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही सूर्यवंशी यांनी केले आहे.
तक्रार किंवा अधिक माहितीसाठी येथे साधा संपर्क:
कार्यालय: दाळवाले बिल्डिंग, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी, अग्रवाल भवन समोर, धुळे
दूरध्वनी क्रमांक: 02562-283340

