

धुळे : शिरपूर तालुक्यातील कुंभीपाडा शिवारातील फत्तेपूर येथे बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उद्धवस्त केला. या कारवाईत एकास अटक करण्यात आली असून सुमारे ७.४३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास नेहूल यांनी शिरपूर तालुक्यातील बनावट दारूची गुप्त माहितीबाबत अधीक्षक स्वाती काकडे यांना कळवले. त्यानुसार फत्तेपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तेलशा चाढ्या पावरा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. निरीक्षक नेहूल यांच्या नेतृत्वाखाली जवान केतन जाधव, काशिनाथ गोसावी, प्रतीकेश भामरे आणि वाहनचालक रविंद्र देसले यांनी ही कारवाई केली. दोन पंचांसमक्ष घराची झडती घेतली असता मुद्देमाल मिळून आला. यामध्ये बॉबी संत्रा ९० मि.ली.च्या ७,५०० सीलबंद बाटल्या (७५ बॉक्स), १,२०० लिटर तयार बनावट देशी दारू (२ प्लास्टिक टाक्यांमध्ये), १६,५०० रिकाम्या बाटल्या ७,००० बनावट लेबल, २ कॅप सिलिंग मशिन, इलेक्ट्रिक मोटर, अल्कोहोल मीटर, २,००० बनावट बुचेसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची अंदाजे कीमत ७,४३,२०० आहे. संशयित आरोपी तेलशा चाढ्या पावरा याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईतील अन्य आरोपी व साहित्य पुरविणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
राज्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीबाबत कुठलीही माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९, व्हॉट्सॲप ८४२२००११३३, किंवा 02562-297484 या क्रमांकांवर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.