

नंदुरबार - उपचारासाठी रुग्णालयात आणलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करीत रुग्णालयातील साहित्यांची तोडफोड करुन नुकसान केल्याची घटना नवापूर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये घडली. डॉक्टरांसह चार जण जखमी झाले असून अज्ञात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेचा नवापूर डॉक्टर असोसिएशनने निषेध नोंदविला आहे.
याप्रकरणी नोबेल हॉस्पिटलचे डॉक्टर अजय कुवर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुजरात राज्यातील सुंदरपूर येथील राजूभाई फत्याभाई गामीत यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने उपचारासाठी त्यांना नवापूर येथील डॉ. अजय कुवर यांच्या नोबेल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. याठिकाणी रुग्णालयातील सहकारी डॉक्टरांनी राजूभाई गामीत या रुग्णावर प्राथमिक उपचार केला. त्यानंतर डॉ. अजय कुवर यांनी देखील त्यानंतर उपचार केले. परंतु हृदयविकाराचा झटक्यामुळे राजूभाई फत्याभाई गामीत यांचा मृत्यू झाला.
रुग्णावर वेळेवर उपचार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळेच रुग्ण मरण पावला; असा आरोप करीत संतप्त नातलगांनी रुग्णालयात वाद घातला. तसेच उपस्थित डॉक्टरांना आणि इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. नोबेल हॉस्पीटलमधील कॉम्प्युटर व वैद्यकीय साहित्यांची तोडफोड करीत मालमत्तेचे नुकसान केले, असे डॉक्टर कुवर यांनी सांगितले.
दरम्यान, तोडफोड व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. फिर्यादीवरून पाच ते सहा अनोळखींविरुध्द नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, नवापूर डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकारी, सदस्यांनी पोलीस ठाण्यात जावून घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवित संबंधित संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.