

धुळे : मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला जमावाने बेदम मारहाण करून घरात कोंडून ठेवले. यातून सुटका करून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला पुन्हा या संतप्त होत जमावाने पुन्हा बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मृत तरुणाच्या नातेवाईकांनी संतप्त होत आरोपींच्या गावातच अंत्यसंस्कार केला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान या प्रकरणात संबंधितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
शिरपूर तालुक्यातील कालापानी येथे ही घटना घडली आहे. शिरपूर तालुक्यातीलच उमर्दा येथील ओमकार रायमल पावरा, कमलसिंग बाळासिंग वसावे, मंगेश उदयसिंग पावरा आणि कमलसिंग उदयसिंग पावरा हे चौघे मित्र कालापाणी गावात त्यांच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी आले होते. यावेळी हे चौघे मित्र एका घराजवळ चर्चा करत थांबलेले असताना गावातील काही तरुणांना त्यांचा संशय आला. त्यांनी या चौघांची चौकशी सुरू केली. यातून वाद सुरू झाला. परिणामी जमावाने या चौघा मित्रांना बेदम मारहाण केली. यानंतर त्यांचे हातपाय बांधून एका घरात त्यांना कोंडून ठेवले.
कमलसिंग वसावे यांनी बांधलेला दोर सोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने त्याला पाठलाग करून पकडले. यानंतर त्याला पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. दरम्यान सकाळी उर्वरित तिघा तरुणांच्या नातेवाईकांनी कालापाणी गाव गाठले. यावेळी चर्चा करून तिघाही तरुणांना सोडून देण्यात आले. यावेळी कमलसिंग वसावे हा देखील पोहोचेल, असे सांगण्यात आले होते
कमलसिंग वसावे घरी पोहोचलाच नाही. त्याचा मृतदेह गावात आढळून आल्यामुळे उमर्दे येथील ग्रामस्थ तसेच कमलसिंग वसावे यांच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान कमलसिंग यांच्या मृतदेहाची उत्तरणी तपासणी केल्यानंतर मृतदेह त्याच्या नातेवाईकांना सोपवण्यात आला. मात्र या नातेवाईकांनी अंत्यविधी उमर्दे गावात न करता आरोपींच्या घराजवळ कालापाणी गावात अंत्यसंस्कार करून रोष व्यक्त केला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण तयार झाले.
या संदर्भात ओंकार पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरसिंग पावरा, बाजीराव पावरा, मुरलाल पावरा, रिंगण्या पावरा, राजेश पावरा ,मिथुन पावरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस पथकाने बाजीराव याला अटक केली आहे.
उमर्देत घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी कालापाणी गावातील संशयीतांची घरे पेटवण्याचा प्रयत्न केला. कमलसिंगचा मृतदेह संशयित खातरसिंग पावराच्या घरासमोर आणून तेथेच अंत्यसंस्कार केले. यावेळी दोन संशयितांची घरे देखील पेटवण्याचा प्रयत्न झाला होता.