

धुळे : धुळे शहरातील सावरकर चौकात पिस्तुलातून गोळीबार करून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली असून, आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेत मुंबईतील सोने-चांदी व्यवसायिकाचे सेल्समन विनय मुकेश जैन व त्याचा सहकारी कर्षण रुपाभाई मोदी हे एसटी बसने धुळ्यात आले असता, हेल्मेट व मास्क घालून तीन इसमांनी पिस्तुलाच्या धाकावर जैन यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर ३५०० ग्रॅम सोन्याचे दागिने व पावत्या असलेली बॅग हिसकावून आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने तपास सुरू केला. मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल्स व टोल नाक्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपींच्या हालचालींचा वेग मिळाला. चोरट्यांनी लूट करण्यापूर्वी दोन दिवस धुळ्यात थांबून रेकी केल्याचेही उघड झाले आहे.
तपासात आरोपी प्रतापगढ (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. मोहम्मद शहरेवार मोहम्मद इबरार खान आणि दिलशान इमरान शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, ते मुंबईत ओला-उबर टॅक्सी चालवत असल्याचेही समोर आले. गुन्ह्यानंतर ते उत्तर प्रदेशात पळून गेले होते. तेथे अन्य खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातही त्यांना अटक झाली होती.
प्रतापगढ पोलीस व न्यायालयाच्या सहकार्याने धुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल २४ लाख ५१ हजार ७०० रुपयांचे, एकूण २६२.८०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.