

धुळे : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेली विदेशी दारु व बिअरची तस्करी करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून कारसह 6 लाख 33 हजार 325 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना धुळे शहरामार्गे डिएन 9 जे 2594 या वाहनातून दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक पवार यांनी पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, संजय पाटील, शाम निकम, सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, सुनिल पाटील, महेंद्र सपकाळ, अतुल निकम यांच्या पथकाला कारवाई करण्यासाठी रवाना केले.
वाहन मालेगाव कडून धुळे मार्गे नवापूरकडे जाणार असल्याची माहिती असल्याने पथकाने नवापूरकडे जाणाऱ्या मार्गावर गस्त सुरू ठेवली. याचवेळी मुंबई आग्रा महामार्गावरील टोल नाक्या जवळील एका शेड जवळ संशयित वाहन उभे असल्याचे दिसून आले. त्यामुळे पथक याठिकाणी पोहोचता वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने पाठलाग करून वाहनास थांबवून चौकशी केली. वाहनचालक भाविनकुमार मगनभाई पटेल (रा. मोटी वाकड गाव, दमन) व प्रतिक धिरुभाई पटेल, (रा. वचला फलिया, गाव-सोनवाडा) अशी संशयित आरोपींची नावे असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले.
पथकाने वाहनासह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात आणून वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीमध्ये मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा आढळून आला. यात एक लाख 33 हजाराच्या दारू साठ्यासह वाहन जप्त करण्यात आले आहे. मोहाडीनगर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(अ), 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.