

पिंपळनेर (धुळे): व्याजाच्या पैशासाठी छडवेल कोडे येथील पिता-पुत्राला बेदम मारहाण करण्यात आली. तलवारीचा धाक दाखवून 10 हजारांची रोकड लुटून नेली, तर अन्य एका घटनेत व्याजाचा तगादा आणि दमबाजीला कंटाळून गावातील तरुण ग्रा. पं. सदस्याने विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपवली. या दोन्हीप्रकरणी पोलिसांनी नाशिकच्या चौघांना अटक केली. या आरोपींमध्ये एक जिम ट्रेनर आणि दोन कुस्तीपटूंचा समावेश आहे.
वारंवार होणारा तगादा आणि दमबाजीला कंटाळून साक्री तालुक्यातील छडवेल कोर्ड येथील धनराज दौलत अहिरराव यांनी 19 डिसेंबरला निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांचा मुलगा वैभवने तीन लाख 50 हजार रुपये व्याजाने घेतले असल्याची बतावणी धनराज आणि त्याच्या वडिलांना नाशिक येथील सचिन मोरे याच्यासह चौघांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच तलवारीचा धाक दाखवून दौलत अहिरराव यांना लोखंडी रॉडने व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. दौलत यांच्या खिशातील 10 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे 24 तासांत हॉटेलचालक सचिन मोरे (29, रा. जुने गंगापूर नाका, नाशिक), जिम ट्रेनर जयपाल गायकवाड (25, रा. मधुबन सोसायटी, गंगापूर रोड, नाशिक), कुस्तीपटू आकाश जाधव (25) व कुस्तीपटू हेमंत पोटांदे (24, रा. संत कबीरनगर, गंगापूर रोड) या चौघांना कारसह पकडले. कारमध्ये पोलिसांना तलवार, रॉड, कुऱ्हाड, दोन चाकू सापडले. त्यांच्या अंगझडतीत जबरी चोरी केलेले 10 हजार रुपये रोख मिळून आले. तीन लाख 50 हजारांचे चार मोबाईल, 10 लाखांची कार असा एकूण 13 लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत या आरोपींचा ग्रामपंचायत सदस्याच्या आत्महत्येच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर अवैध सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामपंचायत सदस्य सुधीर छोटू वेंडाईत याने 14 डिसेंबरला विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यावरून निजामपूर पोलिसांत प्रथमदर्शी आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली होती. पोलिस तपासात नाशिकच्या चौघांनी सुधीर वेंडाईतला व्याजाचे पैसे परत करण्याचा तगादा लावल्यावरून त्याने जीवनयात्रा संपवल्याचे सिद्ध झाले. याबाबत मृताचा चुलतभाऊ गौरव संजय वेंडाईतने दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलिस ठाण्यात या चौघांवर अवैध सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मृत सुधीरचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याला उपसरपंचपद मिळणार होते. मात्र त्यापूर्वीच त्याने सावकारी जाचाला कंटाळून जीवनयात्रा संपवली.