

धुळे : धुळे जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुपारीची तस्करी करणारे सात ट्रक ताब्यात घेतले आहेत. नागपूरहून गुजरातला जात असलेले हे ट्रक साक्री पोलीस ठाणे व धुळे शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावरून अडवण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे 2 कोटी 52 लाख रुपयांची सुपारी जप्त करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात नाकाबंदी सुरू होती. या दरम्यान पोनि श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, प्रतिबंधित सुपारीची तस्करी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक आणि गुजरात नंबरच्या सात ट्रकची तपासणी करण्यात आली. या वाहनांमध्ये सुमारे 2.52 कोटींच्या सुपारीसह कोणतीही वैध कागदपत्रे सादर करण्यात आलेली नव्हती.
त्यानंतर अन्न व औषध प्रशासन आणि जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनांची तपासणी केली. संशयास्पद मालावर पंचनामा करून तो जप्त करण्यात आला. या प्रकरणी सात ट्रक चालकांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे. मोबीन सुलेमान, भुरा मोहम्मद सामीन, धरमपाल यादराम, जफरोद्दीन नुर मोहम्मद, मुखीम खान इलीयास, फकीर अल्लाबक्ष पठाण आणि राहुल सोमाभाई जाट अशी ट्रक चालकांची आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, अमरजित मोरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.