

धुळे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून केल्याप्रकरणी धुळे येथील सत्र न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची, तर इतर तिघांना सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सिताराम आप्पा तलवारे आणि सुनिल जंगलु माळी यांना जन्मठेपेसह दहा हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावास ठोठावण्यात आला आहे. तर सुधाकर तलवारे, गंगाराम मोरे आणि मच्छिंद्र सोनवणे यांना प्रत्येकी तीन महिन्यांचा सश्रम कारावास व एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त कारावास ठोठावण्यात आला आहे.
मालेगाव तालुक्यातील मानके येथील महिला उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल होती. त्यावेळी तिच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या महिलेला गावातील एका पुरुषाने भेट दिली, ज्यामुळे संबंधित महिलांचे नातेवाईक संतप्त झाले. यानंतर, समाधान सोनवणे आणि जितेंद्र मोरे हे धुळे येथून मालेगावकडे जात असताना, लळिंग गावाजवळील लांडोर बंगल्याजवळ आरोपींनी त्यांना अडवले. यावेळी समाधान सोनवणे याच्यावर उपरण्याने गळा आवळून आणि चेहरा पाण्यात बुडवून हत्या करण्यात आली होती.
याबाबत जितेंद्र मोरे यांनी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सचिन गायकवाड यांनी तपास करत आरोपींना अटक केली. गुन्ह्यात वापरलेले उपरणे व मयताचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
या खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश दीपक लक्ष्मणराव भागवत यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अजयकुमार सानप यांनी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या रासायनिक विश्लेषण अहवाल व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षींचा आधार घेत आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
मयत समाधान सोनवणे हा मजुरी व शेतीवर उदरनिर्वाह करत होता. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले असल्याने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अजयकुमार सानप यांनी जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पाहिले.