

शिवाजी शिंदे, मंगळूर
Dharmasthala Temple Violence
मंजुनाथ स्वामी मंदिरामुळे देशभर प्रसिद्ध असलेले मंगळूर जिल्ह्यातील धर्मस्थळ हे तीर्थक्षेत्र देशभरात पुन्हा चर्चेत आलेय ते तिथे घडलेल्या हत्याकांडामुळे. 2005 ते 2013 या कालावधीत धर्मस्थळ शहरात तब्बल शंभर महिलांवर लैंगिक अत्याचार करून नंतर त्यांच्या हत्या करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आल्याची तक्रार खुद्द देवस्थानाच्या माजी स्वच्छता कर्मचार्याने केली आहे. परिणामी चौकशीसाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक नेमले आहे. हे तपास पथक आता दफन मृतदेह उकरून काढत आहे. या मृतदेहांमुळे अनेकांचे बुरखे फाडले जाण्याची शक्यता आहे.
केरळमधील चर्चमध्ये एका फादरनेच ननवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे प्रकरण गाजल्यानंतर आता कर्नाटकातील धर्मस्थळ हे तीर्थक्षेत्र त्यापेक्षा गंभीर हत्याकांडाचे केंद्र बनल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. युवती, महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे खून करायचे आणि मृतदेहांची परस्पर विल्हेवाट लावायची, असे प्रकार तब्बल नऊ वर्षे सुरू होते. तब्बल 100 हून अधिक महिला-युवतींना अशा प्रकारे ठार मारण्यात आले आहे. धर्मस्थळ देवस्थानच्या एका माजी कर्मचार्यानेच तशी तक्रार पोलिसांत नोंद केली आहे. सरकारने आपल्या जीवाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली तर हे हत्याकांड कोणी घडवून आणले, हेही जाहीर करण्याचे प्रतिज्ञापत्र त्या माजी कर्मचार्याने न्यायालयात सादर केले आहे. मी स्वतःच शंभरहून अधिक मृतदेह पुरले किंवा नेत्रावती नदीत फेकले, असे तो कर्मचारी सांगतो. धर्मस्थळच्या सेवेतून निवृत्त झाल्यानतंर गेली दहा वर्षे अनामिक जीवन जगत होतो. पण आता सद्सद्विवेकबुद्धी शांत बसू देत नाही म्हणून पोलिसांपर्यंत गेलो, असेही हा कर्मचारी म्हणतो.
धर्मस्थळ हे देशभरातील एक पवित्र तीर्थक्षेत्र. इथे कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा, आंध्र, तामिळनाडू, केरळमधून दरवर्षी लाखो भक्त भेट देतात. धार्मिक स्थळ असण्यासह ते एक पर्यटनस्थळही आहे. मंजुनाथ मंदिर हे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरात रोज मोफत वाटला जाणारा महाप्रसाद, तिथली शिस्त, जवळूनच वाहणारी नेत्रावती नदी हे सगळे भक्त आणि पर्यटकांना भुरळ घालणारे. पण अशा धार्मिक क्षेत्रात 2005 पासून काहीतरी अधार्मिक घडत होते. तिथे युवती आणि महिलांवर अत्याचार केले जायचे. नंतर त्यांचे खून केले जायचे आणि मृतदेहांची परस्पर विल्हेवाट लावली जायची. त्यानंतर अशा महिलांच्या कुटुंबीयांना गाठून धमकी देऊन किंवा पैशांचे आमिष दाखवून त्यांचे तोंड गप्प केले जायचे.
पोलिस आणि न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत तक्रारदाराने दिलेली ही माहिती, त्याच्या तक्रारीत कितपत तथ्य हे समोर येईलच. पण तक्रारदाराने पोलिस ठाण्यात जाताना एक मानवी कवटीच सोबत नेली होती. यावरून प्रकरणाचे गांभीर्य कळते.
नेत्रावती ही धर्मस्थळची प्रमुख नदी. मंजुनाथ स्वामी दर्शनापूर्वी या नदीत स्नान करून जाण्याची प्रथा आहे. विठ्ठल आणि चंद्रभागेसारखे. याच नेत्रावती नदीत काही युवतींचे मृतदेह फेकून दिले होते, असेही तक्रारदाराचे म्हणणे आहे. शिवाय अनेक मृतदेह नेत्रावतीच्या काठावर पुरले गेले आहेत. ती सगळी ठिकाणे दाखवण्याची तयारी तक्रारदाराने केली आहे आणि विशेष तपास पथक धर्मस्थळमध्ये दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी उत्खननही सुरू आहे.
धर्मस्थळमध्ये 2003 मध्ये पहिली युवती बेपत्ता झाली होती. तिची आई सुजाता भट यांच्याकडे तपास पथकाने चौकशी चालवली आहे. उकरून काढलेल्या मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यासाठी काही शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञ स्वतःहून पुढे आले आहेत.
मी धर्मस्थळात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होतो. या काळात मला जीवे मारण्याची धमकी देऊन मृतदेहांची गुप्तपणे विल्हेवाट लावण्यात आली आहे. मी नेत्रावती नदीच्या काठावर काही मृतदेह पुरले आहेत. मी अनेक मृतदेहांना आग लावली आहे. काही मृतदेह वाहत्या नदीत फेकले आहेत. मला आणि माझ्या कुटुंबाला कायदेशीर संरक्षण मिळाले तर मी गुन्हेगारांबद्दल आणि मी मृतदेहांची विल्हेवाट लावलेल्या ठिकाणांबद्दल माहिती देण्यास तयार आहे, असे त्या स्वच्छता कर्मचार्याने 3 जुलै रोजी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मृतांपैकी बहुतेक मुली होत्या. अनेक मृतदेहांवर कपडे नव्हते. काही मृतदेहांवर चाकूने वार केल्याच्या जखमा होत्या. काही मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते. जेव्हा मी त्यांना याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या आधी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणार्या व्यक्तीने या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास नकार दिला होता. काही दिवस मृतदेहांची विल्हेवाट लावल्यानंतर, मी माझ्या जीवाच्या भीतीने दुसर्या शहरात निघूत गेलो. आता मला तिथे अपराधी वाटत आहे. ज्यांनी चूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून मी आता तक्रार दाखल करत आहे, अशी माहिती तक्रारदाराने केली आहे.
तक्रारदार आपल्यासोबत एक सांगाडा, कवटी घेऊन वकिलांसह न्यायालयात पोहोचला होता. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तक्रारदाराने मृतदेह जिथे पुरले होते त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे.
हत्याकांडाचा रोख कुणाकडे आहे, हे पोलिसांना माहीत आहे. पण आता पोलिसही अडचणीत आले आहेत. कारण या प्रकरणात एसआयटी नेमल्यामुळे काही पोलिस अधिकार्यांचाही बळी जाण्याची शक्यता आहे. शिवाय तक्रार करणारा माजी कर्मचारी देवस्थानाच्या सेवेत होता. त्यामुळे देवस्थानशी संबंधित असलेल्याच कुणाचे तरी हे कृत्य आहे, असेही मानले जाते. पण ते सिद्ध होण्यासाठी पुरावे सापडणार का, तक्रारदार पुरेसा विश्वासू आहे का, डीएनए नमुने जुळतात का, या सार्या प्रश्नांची उत्तरे एसआयटीला शोधायची आहेत.