

देवळाली कॅम्प (नाशिक) : येथील विविध रस्त्यांवर दिवसाढवळ्या कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तसेच तीन दिवसांपूर्वी एक इसमावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या दोघा कोयतादारींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात त्यांना हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून शुक्रवार (दि.26) या दोन कोयताधारांची देवळाली कॅम्प शहरातून पोलिसांनी धिंड काढली.
गेल्या काही दिवसांपासून दररोज भर बाजारपेठेत हाणामाऱ्या, मारहाणीच्या घटना घडत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून कोयताधारी गँग सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन दिवसांपूर्वी सिलेक्शन कॉर्नर येथे भररस्त्यात एका इसमावर केलेला हल्ला व त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना बघून कोयता फिरवणाऱ्या या गँगमधील गुंडांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने दखल घेत योगेश सुनील जाधव (राहणार, स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) व यश विकास मोरे (रा. हाडोळा, देवळाली कॅम्प ) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यांतील कोयता जप्त करण्यात आला आहे, यादोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिसरा आरोपी हा दवाखान्यात उपचार घेत असल्याने तूर्तास त्याची अटक टळली आहे. जाधव व मोरे यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर शुक्रवार (दि.26) त्यांची देवळाली कॅम्प शहरात पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भर बाजारपेठेतून धिंड काढली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे, पोलीस हवालदार हिरामण बिडकर, विजय घुगे, सुभाष जाधव, संतोष पाटोळे आदी उपस्थित होते.