

डी. एच. पाटील, म्हाकवे
शेताभोवती फडे चांगलेच वाढले होते. ‘बसून काय करायचे’ म्हणून इराप्पा ते फडे कापू लागला. पाच-दहा मिनिटे त्याने फडे कापले. तोच एका फड्याच्या मोठ्या बुंध्यात त्याला कुणा एका तीन-चार वर्षांच्या लहान मुलाचा मृतदेह दिसून आला. मृतदेह पाहताच तो घाबरला...
मृग नक्षत्राची सुरुवात झाली, तशी शेतकर्यांनी पेरणीसाठी एकच धांदल सुरू केली. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागाचा पट्टा हा कमी पावसाचा, त्यामुळे पावसावर आधारित पिके ही जेमतेम साधारण उत्पादनाची. म्हणून बेळगाव शेजारच्या या भागात पहिल्या पावसालाच पेरण्या व्हायच्या. आताही मृग नक्षत्रात आभाळात काळे ढग गर्दी करू लागले होते. काही ठिकाणी वळवाने चांगलाच तडाखा दिला होता. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी शेतीच्या कामांमध्ये व्यस्त झाले होते. गावात म्हातारी कोतारी माणसंच तेवढी आढळून येत होती.
आज इराप्पाही असाच आपली सोयाबीन पेरणी करण्यासाठी तिकाटणं (सोयाबीन पेरणी यंत्र) घेऊन जरा लवकरच शेताकडे निघाला होता. पेरणीसाठी त्याला बर्या मुश्किलीने आज चार शेतमजूर मिळाले होते. त्यामुळे ‘टोकण करून रिकामं होतो’ असे म्हणत खांद्याला तिकाटणं अडकून तो डोंगर भागाकडल्या शेताकडे आला होता. आज सकाळी लवकर आल्यामुळे बायकोला ‘न्याहारी घेऊन मजुरांसोबत ये’ असे त्याने बायकोला सांगितले होते.
तो शेतात पोहोचला; परंतु अजून टोकणीपूर्वीच्या मशागतीसाठी सांगितलेल्या बैलवाल्याचा अजून पत्ता नव्हता. वाट पाहाण्याशिवाय पर्याय नसल्याने त्याची वाट बघत शेताच्या बांधाकडेला असणारी कुंपणासाठीची लावलेली काटेरी फडं हातातल्या विळ्याने इराप्पा कापू लागला. पूर्वी या फड्याचा उपयोग दोरखंड वळण्यासाठी केला जात होता; परंतु आता प्लास्टिकचे आणि नायलॉनचे दोरखंड आल्याने याचा वापर कमी झाला. शेताभोवती हे फडे चांगलेच वाढले होते.‘बसून काय करायचे’ म्हणून तो ते फडे कापू लागला. पाच-दहा मिनिटे त्याने फडे कापले. तोच एका फड्याच्या मोठ्या बुंध्यात त्याला कुणा एका तीन-चार वर्षांच्या लहान मुलाचा मृतदेह दिसून आला. मृतदेह पाहताच तो घाबरला. जवळ जाऊन पाहिले तर मृतदेहाला मुंग्या-माशा चिकटल्या होत्या. प्रचंड दुर्गंधी सुटली होती. नाक दाबून धरून त्याने जवळ जाऊन पाहिले; परंतु मृतदेह कुणाचा आहे, हे ओळखून येत नव्हते. घाबरलेल्या अवस्थेतच तो परत गावाकडे आला. गावात येऊन त्याने पोलिस पाटलाचे घर गाठले. त्यांची भेट घेऊन त्याने पोलिस पाटलांना माहिती दिली. पोलिस पाटलांनी शहानिशा करून बेळगाव पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची नीट तपासणी केली. जवळपास चार दिवसांपासून हा मृतदेह इथे पडला असावा. कारण, मृतदेह कुजू लागला होता. काटेरी झुडपांमुळे इतर प्राण्यांना मृतदेहाची विल्हेवाट लावता आली नव्हती. पोलिसांनी जागेवरच पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी जवळपास काही सापडते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. इराप्पाच्या शेताला लागून असणारे फडे पोलिस सुगावा लागतो का, हे पाहण्यासाठी पिंजून काढू लागले. परंतु, पोलिसाना काही आढळून आले नाही. इराप्पाच्या पेरणीचा आज पुरता बट्ट्याबोळ उडाला होता. मयत लहान मुलाच्या अंगावरील कपडे पोलिसांनी जप्त केले. मुलाच्या पायामध्ये डाव्या पायात एक चांदीचे लहानसे कडे होते. ओळख पटवण्यासाठी गावामध्ये चाचपणी सुरू केली. परंतु, तो मृतदेह गावातील कोणत्याही मुलाचा नव्हता. जवळपासच्या गावातून कोण लहान बालक बेपत्ता आहे का, याचा पोलिस शोध घेत होते. परंतु कोणत्याही पोलिस स्टेशनला अथवा आसपासच्या गावामध्ये लहान मूल बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदली गेली नव्हती.
पोलिसांनी जवळपासच्या पंधरा-वीस गावांमध्ये चौकशी सुरू केली. चौकशी करत पोलिस एका गावामध्ये गेले. तेथे बिगारी काम करणार्या काही मजुरांच्या झोपडपट्ट्या पोलिसांना आढळून आल्या. चौकशी करावी म्हणून पोलिस त्या झोपडपट्टीवर पोहोचले. तेथे चौकशी केली असता बिहारमधून आलेल्या एका महिलेचा तीन वर्षांचा मुलगा काही दिवसांपासून गायब असल्याचे आढळले. पोलिसांनी त्या मृतदेहाचे, कपड्याचे फोटो त्या मुलाच्या आई-वडिलांना दाखवताच त्यांनी हंबरडा फोडला. ‘आम्ही बिहारमधील असून, इकडे फारसा कोणाशी संपर्क नसल्याने तक्रार दिली नव्हती’, अशी माहिती मिळाली.
रितसर तक्रार घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. तीन वर्षांच्या बालकाचा खून झाल्यामुळे हा नरबळीचाच प्रकार असावा, या अनुषंगाने पोलिस तपास करत होते. जवळपासच्या रेकॉर्डवरील अनेक मांत्रिकांना बोलावून पोलिसांनी चौकशी केली. परंतु, यात असा कुठलाही नरबळीचा प्रकार घडला नसल्याचे दिसून आले. त्यातच डॉक्टरांच्या तपासणी अहवालानुसार, ‘एखाद्या टोकदार वस्तूने डोक्यात वार करून मृत्यू’ असा रिपोर्ट मिळाला. त्यामुळे वैरभावनेच्या अनुषंगाने जवळपासच्या लोकांवर पोलिसांचा संशय बळावला.
पोलिस चौकशीत त्या झोपडीमध्ये टिकाव व कुदळ असे साहित्य आढळून आले. तपासणी करत असताना त्या घरातील एका टिकावाला (जमीन उकरण्यासाठी वापरण्यात येणारे औजार) सुकलेले रक्तआढळून आले.