संपत्तीच्या मोहात सून बनली हैवान! सासर्‍याला संपवले, वाचा संपूर्ण प्रकरण?

पुरुषोत्तम पुट्टेवार
पुरुषोत्तम पुट्टेवार
Published on
Updated on

[author title="राजेंद्र उट्टलवार, नागपूर" image="http://"][/author]

बक्कळ पैसा, समाजात प्रतिष्ठा असूनही बहीण-भाऊ झाले संपत्तीच्या मोहात हैवान! सुरुवातीला 'हिट अँड रन' असाच काहीसा प्रकार वाटणार्‍या वयोवृद्ध पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघात आणि हत्या प्रकरण अखेर 'सुपारी किलिंग'चाच प्रकार असल्याचे नागपूर पोलिसांच्या तपासातून पुढे आले. पुरुषोत्तम यांची सून अर्चनाने रचला सासर्‍याच्या हत्येचा कट, तिचा भाऊ प्रशांत पार्लेवारने पुरविली माणसे आणि पैसा! याप्रकरणी हत्येचा सुगावा कसा लागला, या हत्याकांडाची संपूर्ण शोधकथा…

पुरुषोत्तम पुट्टेवार (वय 82), रा. बालाजीनगर असे हत्या झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. 22 मे रोजी एका अज्ञात कारने धडक दिल्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद नागपूर पोलिसांत झाली होती आणि नेहमीप्रमाणे पोलिसांचा तपासही फाईलबंद झाला होता. मात्र, घटनेनंतर काही दिवसांनी पुरूषोत्तम यांचे काही नातेवाईक नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांना भेटले आणि त्यांनी हा अपघात नसून पुरुषोत्तम यांचा घातपात झाल्याची शंका व्यक्त केली, तसेच याप्रकरणी काहीजणांवर संशयही व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिस आयुक्त सिंघल यांनी या प्रकरणाचा तपास नागपूर गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिला आणि या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी राज्यभर गाजलेल्या नागपुरातील या 'हिट अँड रन' ते 'सुपारी किलिंग' प्रकरणाचा पर्दाफाश केला.

आरोपींनी फूल-प्रूफ योजना आखून पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा काटा काढला होता. पण, पोलिसांनीही तितक्याच कौशल्याने या हत्येचा पर्दापाश केला. नीरज निमजे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा तरुण पुरुषोत्तम यांचा अपघात झाल्याच्या काही दिवसांपासून अचानक महागड्या पार्ट्या देत होता. कधी कोणत्याही मित्राला दारू न पाजणारा, कधीच पार्टी न देणारा आणि नेहमीच लोकांकडून पैसे उसने मागणारा नीरज निमजे अचानक मित्रांना पार्ट्या देऊ लागला. दारूचे महागडे ब्रँड ऑफर करू लागला होता. त्यामुळे काहींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. खबर्‍यांमार्फत किरकोळ गुन्हेगार असलेल्या नीरजकडे अचानक भरपूर पैसा आला असल्याची, त्याच्या पार्ट्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलिस कामाला लागले. पोलिसांनी निरजच्या संदर्भातील बारीकसारीक तपशील गोळा करायला सुरुवात केली. नीरजच्या अवतीभवती खबरे पेरले. एका अपघाताच्या प्रकरणानंतरच नीरज निमजेकडे भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांना समजली.

झाले… पोलिस सतर्क झाले. नागपूरमध्ये कुठे अपघाताचे प्रकरण घडले आहे का, ज्यामध्ये अद्यापही आरोपी चालक सापडलेले नाहीत, याची माहिती घेत असताना बालाजीनगर भागातील पुरुषोत्तम पुट्टेवार अपघात प्रकरण पुढे आले. संशयित म्हणून गुन्हे शाखा पोलिसांनी नीरज निमजेला ताब्यात घेतले. सुरुवातीला नीरज हा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी नीरजने पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघाती नसून सुनियोजित षडयंत्राने केलेली हत्या असंल्याची कबुली पोलिसांना दिली.

नेमके काय आहे प्रकरण?

पुरूषोत्तम पुट्टेवार यांची शेकडो कोटींची मालमत्ता आहे. पुरूषोत्तम व त्यांची सून अर्चना यांचे फारसे पटत नव्हते. त्यामुळे पुरूषोत्तम आपली सगळी संपत्ती त्यांची मुलगी योगिता व तिच्या मुलीच्या नावे करतील अशी अर्चनाला भीती होती. मात्र सासर्‍याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती केवळ आपल्यालाच मिळावी असा अर्चनाचा हेतू होता. या हेतूने पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सुन अर्चनाने आपल्या भावाच्या मदतीने चक्क सुपारी देऊन त्यांची हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली. या घटनेची मास्टरमाईंड अर्चनाने तिचा भाऊ प्रशांतच्या मदतीने सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांची भर रस्त्यावर कारने चिरडून हत्या घडवून आणली.

विशेष म्हणजे, घटनेनंतर तब्बल 18 दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी अर्चना पुट्टेवार, तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार आणि प्रत्यक्षात हत्याकांड घडवणार्‍या चारही भाडोत्री सुपारी किलरना अटक केली. अर्चनाचे पती मनीष डॉक्टर असून त्यांचा सहभाग याप्रकरणी अजून पुढे आलेला नसला तरी अजूनही काहीजण पोलिसांच्या रडारवर आहेत.

पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात मास्टरमाइंड मुख्य आरोपी अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार यांनी अगदी नियोजित पद्धतीने हा हत्येचा कट रचला. आरोपींनी त्यांच्या घरातील चालक सार्थक बागडे, नीरज निमजे व सचिन धार्मिक यांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून पुरुषोत्तम पुट्टेवार यांची कारने चिरडून हत्या केली. आरोपींनी या कामात दोन कार व पाळत ठेवण्यासाठी एका दुचाकीचाही वापर केला. ही सर्व वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी सचिन धार्मिक याला स्वतःचा बार सुरू करायचा होता. प्रशांत आणि अर्चनाने हीच बाब हेरून सचिनला बारचा परवाना व जागा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार पुरुषोत्तम यांची हत्या केल्यानंतर आरोपी सचिन धार्मिकने बारचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

गुंतागुंतीच्या या प्रकरणात अर्चना आणि प्रशांत यांचा दुसरा भाऊ प्रवीण पार्लेवार यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. प्रवीण पार्लेकरची बायको म्हणजेच पुरुषोत्तमची मुलगी योगिता. पतीच्या मृत्यूमुळे प्रवीणची मालमत्ता योगिताला मिळणारच होती. शिवाय पुरुषोत्तमही आपली शेकडो कोटीची संपत्ती मुलगी म्हणून तिलाच देणार होते. त्यामुळे योगीताला मिळणार्‍या संपत्तीवर प्रशांतचाही डोळा होता. सासर आणि माहेर अशा दोन्हीकडून योगिता पार्लेवारला मिळणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मोह अर्चना आणि प्रशांतला जडला होता आणि त्या मोहापायीच त्यांच्या हातून हा मोठा अपराध घडला.

दोनवेळा मारण्याचा प्रयत्न!

मुख्य आरोपी अर्चनाच्याच इशार्‍यावरून सार्थकने पूर्वीही दोनदा पुरुषोत्तम पुट्टेवार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नशिबाने ते थोडक्यात बचावले होते. शेवटी आरोपींनी त्यांचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने एक कार विकत घेतली आणि 22 मे रोजी ती कार पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अंगावर घालून त्याची हत्या केली व अपघाताचा बनाव केला. मात्र, सीसीटीव्ही आणि नीरजच्या कबुलीने सगळ्यांचेच बिंग फोडले. पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणाची मास्टरमाईंड ही त्यांची सून अर्चना असून अर्चनाचा भाऊ प्रशांतने आर्थिक मदतीसह सार्थक, नीरज आणि अन्य आरोपीची रसद पुरविली.

अर्चनाची पर्सनल सेक्रेटरी पायल नागेश्वरचा देखील सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी सार्थक बागडे, नीरज निमजे, सचिन धार्मिक, संकेत घोडमारे, पायल नागेशवर अशा एकूण सात आरोपींना अटक केली. सध्या ते सर्वजण कारागृहात असून पोलिसांनी गोळा केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे त्यांना कठोर शिक्षा होण्याची प्रबळ शक्यता आहे.

बेहिशेबी मालमत्तेची होणार चौकशी

नागपुरातील उंटखाना परिसरात मॉल उभारण्याचा अर्चना व तिच्या भावाचा प्रयत्न होता. याशिवाय अर्चना ही गडचिरोलीत काही निकटवर्तीयांच्या मदतीने खाण खरेदीच्या तयारीत होती. वर्धा इथेही तिची 15 एकर शेती असल्याची बाब पुढे आली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात सोने आणि नागपुरात 4 फ्लॅट असल्याचेही समजते. प्रशांत व अर्चनाच्या बेहिशेबी मालमत्तेची आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार असल्याची माहिती आहे.

आरोपी उच्चपदस्थ अधिकारी!

अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार हे दोघे बहीण-भाऊ या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार आहेत. प्रशांत हा केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभाग अर्थात् एमएसएमईचा संचालक आहे. अर्चना ही गडचिरोलीच्या नगररचना विभागात सहायक संचालक म्हणून काम करते. तपास पथकाने प्रशांत आणि त्याची बहीण अर्चना या दोघांची समोरासमोर बसवून उलटतपासणी केली. त्यातून अर्चना हिनेच हा हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. यासाठी लागणारी रोख रक्कम, साधन सामग्री तसेच मनुष्यबळ प्रशांत पार्लेवार याने पुरविल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news