Crime News | मोबाईल मोह!

criminals arrested mobile phone obsession
Crime News | मोबाईल मोह!
Published on
Updated on

गणेश गोडसे, बार्शी

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील फपाळवाडी या गावात आश्रम करंडे (वय 31) हा तरुण राहात होता. त्याला दारूचे जबरदस्त व्यसन होते. त्यामुळे घरातील सगळेजण त्याच्या दारूच्या व्यसनाला आणि त्याच्या सततच्या भांडणाला वैतागले होते. त्यामुळे आश्रयचाच सख्खा भाऊ रणजित याने काहीही करून त्याचा काटा काढायचा बेत केला होता. मावसभाऊ सचिन चौधरी व आणखी एक मित्र सोमनाथ तांबे या दोघांना त्याने आपल्या कटात सहभागी करून घेतले.

नियोजनानुसार रणजित याने सचिन आणि सोमनाथ यांच्या मदतीने आधी आश्रयच्या डोक्यात जोरदार घाव घालून त्याला जखमी केले; पण एवढ्याने तो मरत नाही असे दिसताच तिघांनी मिळून नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळून त्याचा खून केला. आश्रयचा खून तर केला, पण आता त्याचे पुढे काय करायचे, याचा त्यांचा प्लॅन तयार नव्हता. म्हणून तिघांनी दूर कुठेतरी नेऊन त्याचा मृतदेह टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावापासून जवळपास 70 किलोमीटर दूर असलेल्या एका कॅनॉलमध्ये आश्रयचा मृतदेह टाकून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पण, अचानक रणजितची ‘ट्यूब’ पेटली. त्याच्या लक्षात आले की, आजकाल पोलिस मोबाईलच्या लोकेशनवरून गुन्हेगारांचा माग शोधून काढतात. त्यामुळे त्याने आपला मोबाईल तर बंद केलाच, वर आपल्या दोन साथीदारांनाही आपापले मोबाईल स्विच ऑफ करायची तंबी दिली. त्यानुसार तिघांनीही आपापले मोबाईल बंद केले आणि सगळेजण पुढच्या कामगिरीवर निघाले.

तिघांनी मिळून आश्रयचा मृतदेह एका मोटारीत घालून घटनास्थळापासून 71 किलोमीटर दूर असलेल्या माढा तालुक्यातील भीमानगर येथील वाहत्या कालव्याच्या पाण्यात त्याचा मृतदेह टाकून दिला. मृतदेह पाण्यातून वर येऊ नये म्हणून त्यांनी त्याचे हातपाय तर बांधलेच आणि वर पुन्हा काही दगडही त्या मृतदेहाच्या गळ्यात बांधले. मृतदेह कॅनॉलमध्ये टाकून दिल्यानंतर आपले काम फत्ते झाले, अशा अविर्भावात तिघेही माघारी फिरले. दरम्यानच्या काळात ठरल्याप्रमाणे तिघांचेही मोबाईल स्विच ऑफच होते. झाले... दुसर्‍या दिवशी आश्रय बेपत्ता असल्याची आवई उठवून आरोपींनीच बार्शी पोलिसांत तो बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी आपले नेटवर्क सतर्क करून तपासाला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात तिघेही आरोपी साळसूदपणाचा आव आणून गावातून फिरत होते, आश्रयचा शोध घेण्याचे नाटकही करत होते; पण म्हणतात ना, कर्म कधी पाठ सोडत नाही. तिघांच्याही बाबतीत अवघ्या चोवीस तासांत याचा प्रत्यय आला.

या प्रकरणाचा तपास करीत असताना बार्शी पोलिसांनी त्या भागातील मोबाईल टॉवर नेटवर्कची तपासणी सुरू केली. त्यावेळी तीन आरोपींपैकी एकाचा मोबाईल त्या परिसरात ट्रेस झाला. पोलिसांनी लगेच सोमनाथला उचलले आणि त्या भागात कशाला गेला होतास, अशी विचारणा करून पोलिसी खाक्या दाखवताच तिघेही पोपटासारखे बोलायला लागले. त्याचे झाले होते असे की, गुन्हा करून झाल्यानंतर, मृतदेह घेऊन जाताना आणि मृतदेह टाकून परत येतानाच्या काळात कुणीही आपला मोबाईल चालू करायचा नाही, असे ठरले होते. ठरल्याप्रमाणे सगळे सुरळीत पार पडत होते; पण सोमनाथ हा होता ‘मोबाईलवेडा’! त्याला फार काळ मोबाईलचा विरह सहन झाला नाही आणि मृतदेह टाकून परत येताना वाटेतच त्याने आपला मोबाईल चालू केला आणि तिघांचाही घात झाला. याच दरम्यान मोबाईल नेटवर्क तपासणी करताना पोलिसांना सोमनाथचा मोबाईल नंबर ट्रेस झाला आणि सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड झाला. शेवटी सोमनाथच्या मोबाईलच्या वेडामुळेच तिघेही पोलिसांच्या हाती लागले, अन्यथा कदाचित खून करून नामानिराळेही राहिले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news